पुणे जिल्ह्यात यंदा प्रथमच दोन टप्प्यांत मतदान; बारामती अन् पुणे लोकसभेबाबत ही प्रशासनाची मोठी डोकेदुखी

0

पुणे : पुणे जिल्ह्यात यंदा प्रथमच दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात घेण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात पुणे, मावळ व शिरूर या उर्वरित तीन मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. दुबार आणि बोगस मतदारांना रोखण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे असे मतदार प्रशासनाची डोकेदुखी ठरणार आहेत. पुणे जिल्हा हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जवळपास १५ हजार ६४२ चौरस किलोमीटर आहे. तेरा तालुक्यांचा असलेल्या जिल्ह्यात २१ विधानसभा मतदारसंघ, तर पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

देशात सात ते आठ टप्प्यात, तर महाराष्ट्रात दोन टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होतात. पहिला असो किंवा दुसरा टप्पा असो, त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघाचा समावेश असायचा. यावेळी मात्र बारामती मतदारसंघात मतदान आधी होणार आहे. मध्यंतरी निवडणूक आयोगाने राबविलेल्या मतदार नोंदणी मोहिमेत बारामती मतदार संघातील दुबार मतदारांचा मुद्दा चर्चेचा विषय झाला होता. माजी आमदार विजय शिवतरे यांनी दुबार मतदारांची यादीच प्रशासनाकडे सादर केली होती.

दुबार मतदारांची नावे वगळण्यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया राबवावी लागते. प्रशासनाने तक्रारीची दखल घेऊन विशेष मोहीम राबवून दुबार मतदारांची नावे कमी केली असल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात अशा दुबार मतदारांची संख्या किती आहे, त्यापैकी किती नावे वगळली, मोहिमेत जे मतदार सापडले नाहीत अशा मतदारांची संख्या किती आहे, यांची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्यात आले आहे. काही नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. जे दुबार मतदार आहेत त्यांना नोटिसा देऊन एकाच ठिकाणी नाव ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरी दुबार नावे असतील, तर ती त्या-त्या विधानसभा निवडणुकीतील सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे दुबार मतदान होणार नाही, याची पुरेशी काळजी घेण्यात आली आहे.

– डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी, पुणे