पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पीएम मोदींच्या दौऱ्यामुळे पुण्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागातील शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी असणार आहे. शाळा प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.






पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानिमित्त पुण्यामध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पीएम मोदींना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते पुण्यात येत आहेत. पीएम मोदींच्या पुणे दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशामध्ये त्यांच्या या दौऱ्यामुळे पुण्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीएम मोदी उद्या पुण्यात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेता. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त असणारा कडक बंदोबस्त, वाहतुकीत केलेले बदल त्याचसोबत वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले रस्ते यामुळे पुण्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात येणार आहे. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील अनेक शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी असणार आहे. मध्यवर्ती भागाबरोबरच कॅम्प, डेक्कन, शिवाजीनगर या परिसरातील काही शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, पीएम मोदींच्या दौऱ्याच्या दिवशी पुण्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेने यासंदर्भात शिक्षण आयुक्तांना निवेदन दिले होते. १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी असून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे.
उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील पुण्यात आहेत. उद्या होणारे सर्व जाहीर कार्यक्रम शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी होणार असून सकाळच्या सत्रात अनेक प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालय सुरू असतात. यामुळे विद्यार्थी आणि पालकांना त्रास होऊ शकतो. यासाठी शाळांना सुट्टी जाहीर करावी अशी मागणी मनसेने केली होती. वाहतुक व सुरक्षेच्या दृष्टीने या दिवशी सर्व शाळा सुट्टी जाहीर करणे उचित ठरेल, अशी प्रतिक्रिया मनसेने दिली होती











