पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंगळवारी (ता. १) शहराच्या मध्यवर्ती भागात दौरा असल्यामुळे काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. तसेच, काही रस्त्यांवरील वाहतुकीत बदल केला आहे. रस्त्यांवर कडेकोट बंदोबस्तही असेल. त्यामुळे वाहतूक कोंडीत अडकायचे नसेल तर नागरिकांनी शहराच्या मध्य भागात येणे टाळावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.






पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात सुरक्षिततेच्या कारणास्तव कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुमारे पाच हजार पोलिस तैनात असणार आहेत. तसेच, विशेष सुरक्षा पथक (एसपीजी), फोर्स वनचे जवान बंदोबस्तासाठी असतील.
दुकाने सुरू ठेवण्यास आडकाठी नाही-
मध्य भागातील दुकाने सुरू ठेवण्यास आडकाठी नसेल. विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेऊन शैक्षणिक संस्थांनी सुटी देण्याबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. शहराच्या मध्य भागातील पीएमपीची वाहतूक सायंकाळी चार वाजेपर्यंत बंद राहणार असून, त्यावेळी पर्यायी मार्गाने व्यवस्था करण्यात आली आहे.
या भागात वाहतुकीत बदल-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, सेवासदन चौक, टिळक (अलका टॉकीज) चौक, टिळक रस्ता, देशभक्त केशवराव जेधे चौक, गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन कॉलेज) रस्ता, संगमवाडी रस्ता, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक आणि विमानतळ रस्ता याठिकाणी बॅरिकेड॒स लावून वाहतूक वळविण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने वाहतूक खुली करण्यात येईल. हा बदल दुपारी तीन वाजेपर्यंत राहील. त्यामुळे वाहनचालकांनी गैरसोय होणार आहे. या मार्गांचा वापर टाळून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा-
सकाळी १० वाजता- शहरात विशेष विमानाने आगमन.(हेलिकॉप्टरने कृषी महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर आगमन)
१०.४५ वाजता – श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर.
११.३५ वाजता – एस. पी. महाविद्यालयात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रमास उपस्थिती.
दुपारी १२.३० वाजता- शिवाजीनगर पोलिस मुख्यालय मैदानावर मेट्रोच्या विस्तारित मार्गाचे उद॒घाटन,
पंतप्रधान आवास योजना सदनिकांचे लोकार्पण












