पुणे – वैधमापनशास्त्र विभागातील निरीक्षकाकडून ३१ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी विभागीय सहनियंत्रकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. येरवडा येथील वैधमापनशास्त्र विभागाच्या कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. डॉ. ललित बेनीराम हारोळे (वय ५५) असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. या संदर्भात वैधमापनशास्त्र विभागातील इस्लामपूर येथील निरीक्षक यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.






‘एसीबी’चे पोलिस उपअधीक्षक नितीन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ललित हारोळे हा येरवडा येथील वैधमापनशास्त्र विभागाचा प्रमुख आहे. हारोळे याने त्याच्या कार्यक्षेत्रात पडताळणी आणि मुद्रांकनासाठी प्रत्येक निरीक्षकाकडे दरमहा चार हजार रुपये हप्ता देण्याची मागणी केली होती.
त्यानुसार इस्लामपूर, कराडमधील दोन आणि सातारा अशा चार निरीक्षकांकडून प्रत्येकी चार हजार रुपये यानुसार १६ हजार रुपये तसेच डायमंड शुगर वर्क कंपनीच्या कामासाठी १५ हजार रुपये अशी एकूण ३१ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत इस्लामपूर येथील निरीक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे कार्यालयात तक्रार दिली होती.
त्याची पडताळणी करून ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी येरवड्यातील वैधमापनशास्त्र कार्यालयात हारोळे याला लाच घेताना अटक केली. ‘एसीबी’चे पोलिस अधीक्षक अमोल तांबे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक शीतल जानवे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर करीत आहेत.










