पुण्यात पकडलेले दहशतवादी तसेच एन आयने पकडलेला झुल्फिकार अली बडोदावाल्याने अनेक जणांना दिवेघाटात बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण दिल्याची आता समोर आली आहे. १८ जुलै रोजी कोथरूड भागातून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती आणि त्यांच्याकडून बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे इलेक्ट्रॉनिक सर्किट सापडले होते. या दोघांच्या मदतीने बडोदावाल्याने काही तरुणांना बॉम्बमध्ये काय काय वापरले जाते आणि तो कसा बनवतात याचे प्रशिक्षण दिल्यामुळे आता या प्रकरणी नवे वळण लागले आहे.
कोथरूड पोलिसांनी पकडलेले दहशतवादी मोहम्मंद खान, मोहम्मंद साकी आणि एनआयएने अटक केलेले दहशतवादी यांचे एकमेकांसोबत कनेक्शन असल्याचे आता समोर आलं आहे. मंगळवारी राज्य दहशतवाद विरोधी पथकाने एनआयएच्या ताब्यातून ज्या झुल्फिकार अली बडोदावाल्याला अटक केली. त्याने या दोघांची मदत घेऊन काही जणांना पुण्यातील जंगलात बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण आणि चाचणी केल्याची माहिती मिळत आहे.
कोथरूड भागात पकडलेले आरोपी यांना बॉम्ब बनवण्याचे ज्ञान होते. त्यांच्याकडे बॉम्ब बनवण्याचे इलेक्ट्रॉनिक सर्किट, ड्रोन कॅमेरा तसेच बॉम्ब बनवण्यासाठी लागणारी पावडर अशी सामग्री आढळून आली.
दुसऱ्या बाजूला झुल्फिकार अली बडोदावाला यानेच या दोघांना घेऊन सासवड घाटाजवळील जंगलात नेऊन काही तरुणांना बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिल्याचे व चाचण्या केल्याची धक्कादायक माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.
दरम्यान, बडोदावाला याने दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविण्यापैकी मुख्य संशयित आरोपी असल्याचेही तपासात निष्पन्न झालं आहे. 2017 ते 2022 या कालावधीत बडोदावाला कोंढवा परिसरात राहण्यास होता. त्याच दरम्यान तो अटक करण्यात आलेल्या सर्वांच्या संपर्कात होता.
दरम्यान, रतलाम येथील हे दोन्ही दहशतवादी अलसुफा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत तर एनआयएने अटक केलेले दहशतवादी महाराष्ट्र मोड्युलशी संबंधित आहेत. मात्र या सर्वाचे अंतीम ध्येय्य इसिस या दहशतवादी संघनेशी काम करण्याचे असल्याचे सध्या दिसतंय. त्याअनुषंगाने केंद्र व राज्यपातळीवर सर्व तपास यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.
आतापर्यंत याप्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या कादीर दस्तगीर पठाण आणि सिमाब काझी यांच्या मार्फत बडोदावाला याने आर्थिक रसद पुरविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या टेक्नीकल डेटा विश्लेषणावरून ते एकमेकांच्या संपर्कात असल्याचे देखील निष्पन्न झाले आहे. बडोदावाल्याला कोर्टाने ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.