पुणे – सराईत गुन्हेगाराविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असूनही कठोर कारवाई केली नाही, असा ठपका ठेवत वारजे पोलिस ठाण्यातील तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह ७ जणांना शहर पोलिस दलातून निलंबित करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश शनिवारी (ता. १) काढले. पोलिस आयुक्तांनी कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात सुरवात केली आहे. त्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दगडू सायप्पा हाके, पोलिस निरीक्षक दत्ताराम गोपीनाथ बागवे, पोलिस उपनिरीक्षक मनोज रामदास बागल, पोलिस उपनिरीक्षक यशवंत भिमशा पडवळे, पोलिस उपनिरीक्षक जनार्दन नारायण होळकर, पोलिस नाईक अमोल विश्वास भिसे आणि पोलिस नाईक सचिन संभाजी कुदळे अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत.
सराईत गुन्हेगार पपुल्या वाघमारे याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचे सात गुन्हे दाखल आहेत. तरीही वारजे पोलिसांनी त्याच्यावर ‘मोका’ची कारवाई केली नाही. वारजे पोलिसांनी कायदेशीर बाबीचा अभ्यास न करता जुजबी तडीपारीचा प्रस्ताव दाखल केला. गुन्हेगारांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्यामुळे ही निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे आदेशात नमूद केले आहे. दरम्यान, यापूर्वी कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यातील तीन पोलिस कर्मचारी आणि सहकारनगर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह सात जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस आयुक्तांच्या भूमिकेचे स्वागत
शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जात आहे. पोलिस आयुक्तांनी गेल्या सहा महिन्यांत ३१ गुन्हेगारी टोळ्यांवर मोका कायद्यांतर्गत कारवाई केली. मोका कायद्यांतर्गत २७७ आणि एमपीडीए कायद्यांतर्गत २४ सराईत गुन्हेगारांची कारागृहात रवानगी केली आहे. तर, दुसरीकडे कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या या भूमिकेचे समाजमाध्यमातून स्वागत केले जात आहे.