वैष्णवांचा मेळा आज पुण्यनगरीच्या दिशेने; ७५०० पोलिस तैनात; आठ लाख वारकरी भक्तीत तल्लीन

0

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्‍गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या उद्या (ता. १२) होणाऱ्या आगमनासाठी पुणे महापालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलिस सज्ज झाले आहेत. यंदा सात ते आठ लाख वारकऱ्यांचे पुण्यनगरीत आगमन होण्याची शक्यता आहे. पालखीत कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांनी आवश्‍यक ती सर्व खबरदारी घेतली असून, यंदा साडेसात हजार पोलिस तैनात असणार आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सोमवारी सकाळी आळंदी रस्त्यावरील येरवडा क्षेत्रीय कार्यालयातर्फे कळस येथे सकाळी ११.३० वाजता स्वागत करण्यात येणार आहे, तर संत तुकाराम

महाराज पालखीचे बोपोडी येथे दुपारी एक वाजता स्वागत केले जाईल. महापालिकेने वारकऱ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. शहरात वारंवार स्वच्छता करणे आणि आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी नियोजन केले आहे. दोन दिवस लाखो वारकरी पुण्यात मुक्कामी असताना त्यांचा निवास, आरोग्य आणि या काळात शहर स्वच्छ असावे यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. दोन्ही पालखी सोहळे सोमवारी (ता. १२) आणि मंगळवारी (ता. १३) पुण्यात मुक्कामी असणार आहे. बुधवारी सकाळी ते पुढच्या मुक्कामाच्या दिशेने जाणार आहेत.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

पालख्यांचे आगमन तसेच पालखी मार्गस्थ होत असताना शहरातील काही रस्ते बंद करण्यात येतात. त्यामुळे होणारी वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी पालखीमार्गावरील प्रमुख चौक आणि रस्ते टप्प्याटप्प्याने वाहतुकीस बंद आणि सुरू करण्यात येणार आहेत. पुणे पोलिसांनी उपलब्ध केलेल्या लाइव्ह लोकेशन सुविधेमुळे पालखी सोहळ्याची माहिती नागरिकांना उपलब्ध होईल. तसेच वाहतुकीचे नियोजनही करणे शक्य होणार आहे.

उद्योगनगरी भक्तिरसात रंगली

खांद्यावर वारकरी संप्रदायाची पताका घेऊन चालणारे वारकरी, त्यांच्या मुखातून होणारा माउली-तुकोबारायांचा अखंड जप व त्यांची सेवा करणारे नागरिक असे वातावरण रविवारी (ता. ११) पिंपरी-चिंचवडमध्ये बघायला मिळाले. निमित्त होते, आषाढी वारीनिमित्त देहू येथून पंढरपूरकडे निघालेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमनाचे.

त्यात सहभागी वारकऱ्यांची सेवा करण्यात शहरातील नागरिकांनी रविवार सत्कारणी लावला. कुणी पाणीवाटप करत होते, तर कुणी केळी, बिस्कीट, नाश्ता. काहींनी आरोग्य सेवा केली तर काहींनी पादत्राणे दुरुस्त करून चरणसेवा केली. संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी आकुर्डीत मुक्कामी पोहोचला.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

अलंकापुरीत हरिनामाचा गजर

गर्दीने फुललेला इंद्रायणी तीर… उंचावणाऱ्या भगव्या पताका…. असा ओसंडून वाहणारा भक्तिरस आज आळंदीकरांनी अनुभवला. अवघ्या महाराष्ट्रातून आलेल्या लाखो वैष्णवांच्या मेळ्याने इंद्रायणीचे दोन्ही काठ आणि अवघी अलंकापुरी माउली नामाच्या अखंड जयघोषात मंत्रमुग्ध झाली.

घराण्यात परंपरेने चालत आलेली आपली पंढरीची वारी विठुरायाच्या चरणी समर्पित करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून भाविक पाच दिवस आधीपासूनच आळंदीत दाखल होत होते. मुंबई, कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातून मोठ्या संख्येने भाविकांचा त्यामध्ये समावेश होता. ठिकठिकाणी राहुट्या, धर्मशाळांमधून वारकऱ्यांचा मुक्काम आहे.

पोलिसांनी केलेली तयारी

शहरातील रस्ते टप्प्याटप्प्याने बंद व सुरू करणार

पोलिसांकडून लाइव्ह लोकेशन सुविधेचा वापर

पालखीमार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवणार

बंद व खुले असलेल्या रस्त्यांची माहितीही मिळणार

गर्दीचे नियोजन, अनुचित घटना रोखण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात

diversion.punepolice.gov.in या संकेतस्थळाची निर्मिती

आयुक्त, सहआयुक्त, चार अतिरिक्त पोलिस आयुक्त, १० पोलिस उपायुक्त बंदोबस्तात सहभागी

पोलिस, होमगार्ड आणि एसआरपीएफ असा सात हजार पोलिसांचा बंदोबस्त

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

पालखी पुण्यात असताना मेट्रोचे काम बंद राहणार

अशी केली आहे तयारी

वारकऱ्यांसाठी निवास

शहर स्वच्छ असावे यासाठी पथके

क्षेत्रीय कार्यालयाच्या मागणीनुसार तीन हजार ०९३ फिरती शौचालये

पालखी मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छतागृहांची यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता

मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा त्रास होणार नाही यासाठीची उपाययोजना

महापालिकेच्या दवाखान्यात मोफत उपचार

भवानी पेठेतील सोनवणे रुग्णालयासह इतर दवाखाने २४ तास खुले असणार

पालखीमार्गावर २० ठिकाणी आरोग्य पथक

पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सुविधा

सातत्याने रस्त्यांची साफसफाई

संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालख्यांचे सोमवारी शहरात आगमन होत आहे. त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. आवश्‍यक त्या सर्व सोयी-सुविधा भाविकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

– विक्रम कुमार, आयुक्त, महानगरपालिका

पालखीमार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यातील भाविकांच्या गर्दीचे नियोजन, अनुचित घटना रोखण्यासाठी बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. यंदा पालखीत सात ते आठ लाख भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे.

– रितेश कुमार, पोलिस आयुक्त