आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं आज आळंदीमधून प्रस्थान झालं. मंदिर व्यवस्थापनाने केवळ मानाच्या पालख्यांना मंदिरामध्ये प्रवेश दिल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिस आणि वारकऱ्यांमध्ये झटापट झाली. आळंदीमध्ये पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केल्यांचं सांगितलं जात आहे. अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी या घटनेचा निषेध केला आहे. मात्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाठीचार्ज झाला नसल्याचं सांगून केवळ बाचाबाची आणि झटापट झाल्याचं स्पष्ट केलं.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
आळंदीमध्ये लाठीचार्ज झालेला नाही. वारकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची आणि झटापट झाली. मागील वर्षी तेथे चेंगराचेंगरी झाली होती. महिलाही जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावेळी काटेकोरपणे नियम पाळले जात आहेत. मानाच्या ५६ दिंड्यांमधील ७५ पासेस देण्यात आले होते. मंदिराबाहेर काही वारकरी आणि तरुण होते त्यांची मागणी आत जाण्याची मागणी होती. ४००-५०० जण आत जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी त्यांना थांबवलं. त्यामुळे थोडा तणाव निर्माण झाला होता, असं गृहमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिला सुद्धा जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत 3 वेळा बैठका घेऊन गेल्यावर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून प्रत्येक मानाच्या पालखीतील प्रत्येकी 75 जणांना प्रवेश देण्याचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला होता, अशी माहिती पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिली.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
“जे आजवर कधीही घडले नाही ते यावर्षी घडले. वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. यापूर्वी कधीही वारकऱ्यांवर बळाचा वापर केल्याची घटना घडली नव्हती. आपल्या साध्या आणि सोप्या शिकवणूकीतून वारकऱ्यांनी देशाला वेळोवेळी दिशा दाखविली आहे. माऊलींच्या दिंडीसोहळ्याला प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे गालबोट लागले. दिंडीसोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांवर झालेला लाठीहल्ला हा अतिशय संतापजनक प्रकार आहे. याप्रकरणी दोषी व्यक्तींची चौकशी करुन त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे”, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.