देशभरात लोकसभेच्या निवडणुकांची तयारी सर्व राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. या मध्ये महाराष्ट्रात देखील मविआ आणि भाजप-शिवसेनेने लोकसभेसाठी कंबर कसली आहे. यासोबतच आता भाजप-शिवसेना महायुतीच्या जागा वाटपाची प्राथमिक चर्चा सुरु आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने आज ५ वाजता लोकसभा निवडणुकांवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली आहे.






२०२४ मध्ये जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीने नवा प्लॅन तयार केला आहे. दिग्गजांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा नवा फंडा राष्ट्रवादी काँग्रेस वापरणार आहे. त्यासोबतच युवा नेत्यांना देखील पक्ष संधी देणार आहेत. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीने आमदार हसन मुश्रीफ यांना कोल्हापुर लोकसभेतून तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील आणि कर्णसिंह गायकवाड यांना उतरवण्याच्या हालचाली सुरू करण्यात केल्या आहेत.
त्याबरोबर अशी चर्चा आहे की, बीड लोकसभेच्या जागेवर माजी मंत्री धनंजय मुंडे यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. मात्र अजून पर्यत पक्षाने कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केली नाही. मात्र आज होणाऱ्या बैठकीत जागांवर चर्चा होणार आहे.
दरम्यान मविआमध्ये जागा वाटपावरून मतभेद पाहिला मिळाले होते. विरोधी पक्ष नेते अजित, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे मविआ मधील वाद चव्हाट्यावर आला होता. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी जागांवाटपावर संयमी भूमिका घेतली असून शिवसेनेसाठी जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे.











