PFचा पैसा काढताना ही चूक टाळा, नाहीतर पेन्शनवर पाणी! EPFOचं महत्त्वाचं आवाहन

0
22

नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी EPFO कडून एक महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. भविष्यनिर्वाह निधी म्हणजेच PFमधील रक्कम ही केवळ आपत्कालीन खर्चासाठीच नव्हे, तर निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षेसाठी ठेवलेली असते. मात्र बऱ्याच वेळा नोकरी बदलताना किंवा काही गरजेपोटी अनेक कर्मचारी आपला पूर्ण PF रक्कम काढून टाकतात आणि यामध्ये EPS म्हणजेच कर्मचारी पेन्शन योजनेतील रक्कमही निघून जाते. यामुळे पेन्शन मिळण्याचा हक्कच संपतो.

EPFOच्या नियमांनुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याने 10 वर्षांहून अधिक काळ आपले PF योगदान सुरू ठेवले असेल आणि EPSमधील रक्कम काढली नसेल, तर तो 50 वर्षांनंतर पेन्शनसाठी पात्र ठरतो. मात्र EPSमधील रक्कम एकदा काढली, की भविष्यात पेन्शन मिळवण्याची संधीही हातून निघून जाते. त्यामुळे EPFOने कर्मचाऱ्यांना आवाहन केलं आहे की, PFमधून रक्कम काढताना EPSच्या रकमेची विल्हेवाट विचारपूर्वक लावा.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

यासोबतच EPFOने 1 जानेवारी 2025 पासून पेन्शनधारकांसाठी एक नव्या सुविधेची सुरुवात केली आहे. याअंतर्गत पेन्शनधारक आता कोणत्याही बँकेतून आपली पेन्शन रक्कम प्राप्त करू शकतात. यापूर्वी ही सुविधा निवडक बँकांपुरती मर्यादित होती. पण आता डिजिटल पडताळणीच्या आधारे, गावात, शहरात किंवा देशाच्या कोणत्याही भागातून पेन्शन मिळवणं शक्य झालं आहे.

जगभरात महागाई आणि आर्थिक अस्थिरतेच्या काळात, निवृत्तीनंतरही नियमित उत्पन्न मिळणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे PFमधील EPS रक्कम म्हणजे भविष्यातील आधारस्तंभ आहे, हे लक्षात घेत EPFOने कर्मचाऱ्यांना सचोटीने आणि दूरदृष्टीने निर्णय घेण्याचं आवाहन केलं आहे. एक चुकीचा निर्णय आयुष्यभराच्या पेन्शनवर पाणी फेरू शकतो.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे