अनधिकृत फलकबाजी विरोधात ‘प्रशासक’ सक्रिय पण माननीय यांची ही ‘क्लुप्ती’ व्यावसायिकांची होईल चांदी

0

पुणे शहरामध्ये अनाधिकृत फलकबाजीने शहराचे विद्रूपीकरण केल्याचे प्रशासक पुणे महापालिका आयुक्त यांच्या लक्षात आल्यानंतर अनधिकृत फलक बाजी करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. शहरात अनधिकृत फ्लेक्स लावून आगामी निवडणुकीसाठी स्वतःची जाहिरात करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना ही चूक महागात पडेल अशी भोळी आशा महापालिका आयुक्तांना वाटत असतानाच माननीय सभासद आणि स्थानिक कर्मचारी अधिकारी यांनी ‘फलक अनेक कारवाई एक’ अशी नामी क्लुप्ती शोधून काढल्यामुळे नव्या निर्णयाचाही बट्ट्याबोळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच अधिकारी कर्मचारी अनधिकृत फलका विरोधात कारवाई करण्यापेक्षा दंड लावण्याला प्राधान्य देत असल्यामुळे जागोजागी व्यावसायिक फलकांनाही अभय मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. उमेदवारी अर्ज भरताना फ्लेक्सचा दंड भरला की नाही हे तपासले जाणार आहे. याचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्यास अर्ज बाद होऊ शकतो. फ्लेक्सबाजी थांबविण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेतला आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

पुणे शहरात अनधिकृत फ्लेक्स, बॅनर लावून फुकटात जाहिरातबाजी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यात शिक्षण संस्था, खासगी शिकवणी, बांधकाम व्यावसायिक, अन्य व्यावसायिक यांच्या जाहिरातींचा समावेश आहे. पण महापालिका निवडणूक तोंडावर आलेली असताना राजकीय पुढाऱ्यांच्या जाहिरातींचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. प्रत्येक चौकात, रस्त्यावर अनधिकृत फ्लेक्स लावले जात आहेत. त्यामुळे शहराच्या विद्रूपीकरणात भर पडत आहे.

महापालिकेतर्फे अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांना १ हजार रुपयांचा दंड केला जातो. हा दंड भरण्याकडे कार्यकर्ते, राजकीय व्यक्ती दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळेच प्रशासनाने उमेदवारी अर्ज भरणाऱ्या राजकीय व्यक्तीने फ्लेक्सचा दंड भरला की नाही हे तपासले जाणार आहे. जर उमेदवाराकडे दंड भरल्याचे ना हरकत प्रमाणपत्र नसले तर तो अर्ज बाद केला जाणार आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

राजकीय व्यक्ती त्यांचे वाढदिवस किंवा कारणाने प्रभागाच्या कानाकोपऱ्यात अनेक फ्लेक्स लावतात. त्या प्रत्येक फ्लेक्सवर १ हजार रुपयांचा दंड वसूल करणे आवश्यक आहे. पण क्षेत्रीय कार्यालयस्तरावरील कर्मचारी कारवाई दाखविण्यासाठी केवळ एक हजार रुपयांचा दंड ठोठावतात आणि बाकीच्या सर्व फ्लेक्सला अभय देतात. माननीयांच्या वाढदिवस आला कि, त्याच्या तीन दिवस आधी सर्वत्र फ्लेक्स लागतात. पण माननीयांच्या फ्लेक्सवर कारवाई केली नाही. वाढदिवस झाल्यानंतर फ्लेक्सवर कारवाई केली. अशा प्रकारे कर्मचाऱ्यांकडूनच फ्लेक्सला अभय दिले जात आहे.

‘महापालिका निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारावर अनधिकृत फ्लेक्सचा दंड नसल्याचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.’

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

– माधव जगताप, उपायुक्त, आकाशचिन्ह विभाग