गेल्या पाच ते सहा वर्षांपासून यूपीआय, एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस यांसारख्या डिजिटल पेमेंट पद्धतीचे आर्थिक व्यवहारातील प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आता चेकने पेमेंट करण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे.अर्थात, आजही ज्येष्ठ नागरिक किंवा डिजिटल पेमेंट पद्धतीचा वापर करण्यासाठी उत्सुक नसलेले लोक चेकचा वापर करतात. त्यामुळे आजही चेकद्वारे होणाऱ्या व्यवहारांचे प्रमाण लक्षणीय आहे.






आपण एखाद्या व्यक्तीला काही रक्कम द्यायची असेल, तर त्या व्यक्तीच्या नावाने चेक लिहून देतो. ती व्यक्ती तिचे ज्या बँकेत खाते असेल, त्या बँकेत तो चेक भरते आणि नंतर तो बँकेच्या क्लिअरिंग प्रक्रियेतून जाऊन त्या व्यक्तीच्या नावावर पैसे जमा होतात.
चेक देणारा आणि घेणारा या दोघांची बँक एकच असेल, तर तो चेक लगेचच वठतो आणि रक्कम ज्याला चेक दिला आहे, त्या व्यक्तीच्या खात्यात जमा होते, याला इंट्राबँक ट्रान्स्फर असे म्हणतात. दोघांची बँक वेगळी असेल, तर तो चेक इंटर बँक क्लिअरिंग व्यवस्थेमार्फत क्लिअरिंगसाठी पाठविला जातो. चेक भरल्यापासून एका कामकाज दिवसानंतर रक्कम जमा होते. या दरम्यान, एखादी सुट्टी आल्यास हा कालावधी वाढतो.
क्लिअरिंगच्या पद्धतीत बदल
आता हा कालावधी आणखी कमी करण्याच्या उद्दिष्टाने क्लिअरिंगच्या पद्धतीत एक जानेवारी २०२५ पासून महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. चेक बँकेत भरल्यानंतर केवळ दोन तासांत तो क्लीअर होणार आहे.
याला ‘कंटिन्यूअस क्लिअरिंग’ असे म्हणतात. थोडक्यात, सध्याची बॅच प्रोसेस बंद होत आहे. यामुळे सकाळी १० ते दुपारी २.३० पर्यंत भरलेला चेक त्याच दिवशी पुढील दोन तासांत आपल्या खात्यात जमा होईल.
विशेष म्हणजे आपण दिलेला चेक आपल्या खात्यावर असलेल्या ओपनिंग बॅलन्सनुसार नावे टाकला जाईल. यामुळे आपण आज चेक दिला असेल, तर तो आजच आपल्या खात्यात पुढील दोन तासांनंतर कधीही नावे पडू शकतो, हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे, त्यानुसार खात्यात पुरेशी शिल्लक असेल, तरच चेक द्यावा. आधीप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी रक्कम आपल्या खात्यात जमा करून चालणार नाही.
या नव्या बदलामुळे चेकद्वारे होणारे पेमेंटही वेगाने होणार आहे. अर्थात, ते डिजिटल पेमेंटसारखे झटपट होणार नसले, तरी केवळ दोन तासातच होणार असल्याने चेकद्वारे व्यवहार करणाऱ्या असंख्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बँकिंग सिस्टीममधील हा एक आमूलाग्र बदल आहे, हे नक्की !











