भारतीय विद्यार्थ्यांसाठी Alert… सर्वात कठीण परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; केलं ‘हे’ आवाहन

0

भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा तणाव शिगेला पोहचला आहे. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या राज्यांमध्ये 8 मे च्या रात्री हवाई हल्ल्यांच्या भितीने संपूर्ण ब्लॅक आऊट पाळण्यात आला. भारत सरकारकडून या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. याच युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता भारत सरकारने शिक्षण क्षेत्रासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतातील सर्वात कठीण परिक्षांपैकी एक असलेली चार्टर्ड अकाउंटंट्सची परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

…म्हणून पुढे ढकलण्यात आल्या परीक्षा
भारतामधील चार्टर्ड अकाउंटंट्ससंदर्भातील नियम करणाऱ्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’कडून महत्वाची घोषणा करणारं पत्रकच जारी करण्यात आलं आहे. देशातील तणावपूर्ण परिस्थिती आणि सुरक्षेसंदर्भातील चिंता तसेच सध्याच्या घडामोडी लक्षात घेत ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ने सीए फायनलच्या परीक्षांचे पेपर पुढे ढकलले आहेत. सीए फायनल्सबरोबरच इंटरमीडिएट आणि पीक्यूसी परीक्षांचे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ने घेतल्याचं पत्रकातून स्पष्ट केलं आहे.

या तारखांचे पेपर पुढे ढकलले
नियोजित वेळापत्रकानुसार ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’कडून घेण्यात येणाऱ्या या परीक्षा 9 मे 2025 ते 14 मे 2025 दरम्यान घेतल्या जाणार होत्या. मात्र या सर्वच परीक्षा आत पुढे ढकलण्यात येत असल्याचं ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ने जाहीर केलं आहे. ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’चे सह-सचीव सीए आनंद कुमार चतुर्वेदी यांच्या नावाने विद्यार्थ्यांसाठी सूचना देणारं पत्रक जारी करण्यात आलं आहे.