बीडच्या जिल्हा रुग्णालयात रविवारी सकाळी एका मातेचा प्रसुतीनंतर मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता चौकशीसाठी त्रिसदस्य समिती स्थापन करण्यात आली आहे. छाया पांचाळ असं मृत मातेचे नाव होते. या मातेच्या मृत्यू प्रकरणात डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. याची दखल घेत पाच सदस्य समिती समोर छाया पांचाळ यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.






मात्र, या चौकशी समिती समोर जाण्याआधीच स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांकडून कागदपत्रे बदलल्याची चर्चा रुग्णालयात सुरू आहे. तसेच डॉक्टरांना वाचविण्यासाठी काही राजकीय नेत्यांनीही फिल्डिंग लावल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
छाया पांचाळ या मातेचे मृत्यू प्रकरण ताजे असतानाच सोमवारी सकाळी आणखी एका मातेची प्राणजोत मालवली. सलग दुसऱ्या दिवशी जिल्हा रुग्णालयात झालेल्या मातेच्या मृत्यूमुळे जिल्हा रुग्णालयात नेमकं चाललय काय? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. आठवड्यातील हा तिसरा माता मृत्यू आहे.
जिल्हाशल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांचे निलंबन झाल्यानंतर जिल्हा रुग्णातील आरोग्य सेवा सध्या कोलमडली आहे. डॉक्टर संजय राऊत यांच्याकडे जिल्हा शल्य चिकित्सकाचा पदभार आहे. मात्र, आठवडाभरात तीन मातांचा मृत्यू झाल्याने जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा ही व्हेंटिलेटरवर असल्याचे दिसून येते आहे.
आवादा एनर्जी प्रकल्पात चोरी करणारी टोळी जेरबंद
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे कारण ठरलेल्या आवादा एनर्जी प्रकल्पावर एका टोळीकडून चोरी करण्यात आली होती. या गुन्ह्याची उकल बीड पोलिसांनी केली असून दहा पैकी चौघांना अटक केली आहे. या टोळीवर बीड पोलिसांकडून मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. 11 मार्च रोजी मसाजोग येथील आवादा एनर्जी प्रकल्पावर चोरी झाली. त्यानंतर 7 एप्रिल रोजी त्याच परिसरातील विडा येथील आवादा कंपनीच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधून मारहाण करत 11 लाख रुपयांचे साहित्य चोरी करण्यात आले होते. या दरम्यान चोरट्यांनी लाखो रुपयांचे साहित्य लंपास केले होते.
पोलिसांनी याचा तपास करत या टोळीतील दहा पैकी चौघांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून चार गुन्हे उघड झाले असून या टोळीवर विविध ठिकाणी 27 गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पोलीस मुख्य आरोपीचा शोध घेत असून टोळीवर मकोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव दिला गेलाय.











