पुण्यातील भोंदूबाबा प्रसाद तामदार याचे हायटेक कारनाम्यांनी श्रद्धेचा बाजार मांडला आहे. श्रद्धेच्या आडून भाविकांचा शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या या बाबाचे पितळ उघडे पडले आहे. या बाबाला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुळशी तालुक्यातील सुस गावातील स्वामी समर्थ बिल्डिंगमध्ये त्याचा मठ आहे. अनेक महिलांना आंघोळ घालताना, त्यांच्यासोबत विचित्र डान्स करताना, महिलांची ओटी भरतानाचे बाबाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. तो स्वतःला दिव्यशक्ती असलेला अध्यात्मिक गुरू भासवत होता. समलैंगिक संबंधासाठी बाबा अनेक अघोरी प्रकार करायचा. त्याचे एक एक कारनामे आता समोर येत आहेत.
असे फुटले बिंग
प्रसाद तामदार याच्या एका भक्ताचा मोबाईल सतत गरम होत होता. या भाविकाने त्याच्या मित्राला मोबाईल दाखवला. लॅपटॉपच्या मदतीने त्याने मोबाईल तपासला. त्यात त्याला एअर ड्रॉइ़ड कीड ॲप दिसले. त्यावरून सदर मोबाईल बाहेरून कोणीतरी ऑपरेट करत असल्याचे त्याने सांगितले. त्याला बाबाने हा मोबाईल काही काळ घेतल्याचे आठवले. त्याने इतर भक्तांना याविषयी विचारले. त्यांना पण असाच अनुभव आला.
हा बाबा मोबाईलमध्ये एअर ड्रॉइ़ड कीड ॲप डाऊनलोड करायचा. या ॲपच्या माध्यमातून तो भक्तांची हेरगिरी करायचा. ते सध्या कुठे आहेत. त्यांनी कोणते कपडे घातले आहेत. त्यांनी दिवसभरात काय काय केले यांची इत्यंभूत माहिती तो भक्तांना द्यायचा. त्यामुळे बाबाकडे कोणती तरी मोठी शक्ती असल्याचा विश्वास भक्तांना बसायचा. तामदार याचा पुण्यातच नाही तर महाराष्ट्रात मोठा भक्त परिवार असल्याचे समोर आले आहे.
भक्तांसोबत समलैंगिक संबंध ठेवायचा
प्रसाद हा भक्तांचा विश्वास संपादन करायचा. त्यांच्यावर मोठे प्राणघातक संकट येणार असल्याचा दावा करायचा. त्यानंतर त्यांना अघोरी पुजा करण्यासाठी मठात बोलवायचा. त्याअगोदर तो भक्ताला मठात बोलावून त्याला पुढील दोन दिवस जागरण करण्यास सांगायचा. त्याला मंत्र जपायला सांगायचा. कुटुंबातील मंडळींना भक्ताला जागी ठेवण्यासाठी बजावायचा.
दोन-तीन दिवस न झोपलेला हा भक्त पेंगतच मठात दाखल व्हायचा. मग बाबा त्याला सर्व कपडे काढून शाल पांघरायला द्यायचा. त्याच्याकडून काही थोतांड विधी करून त्याला झोपायला सांगायचा. कुटुंबियांना बाहेर थांबवायला सांगायचा. त्यानंतर झोपी गेलेल्या या भक्तासोबत तो लैंगिक चाळे करायचा. भक्ताला जाग आल्यावर तो त्याला तुझ्या सर्व समस्या आणि संकटं मी माझ्यावर घेत असल्याचा बनाव करत त्याला लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडायचा.