नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा

0

राज्यातील फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी झाला असून आता पालकमंत्रीपदाचे वाटप कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच, बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळेही पालकमंत्रीपदाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मंत्री धनंजय मुंडेंना देऊ नये, उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा मुख्यमंत्र्‍यांनी पालकमंत्रीपद स्वीकारावे अशी मागणी बीडमधील लोकप्रतिनिधी व सकल मराठा समाजाच्या समनव्यकांनी केली आहे. आता, बीडनंतर नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही मुंडेंना नको, असा सूर उमटत असून नांदेडमधील सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी आज ती भूमिका मांडली. त्यामुळे, पालकमंत्रीपदावरुन मुंडे अडचणीत येत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनापू्र्वीच पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली जातील. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसला जाण्यापूर्वीच ही नावे जाहीर होतील, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे, पुढील 2 ते 3 दिवसांत जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर होणार आहेत.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख याचा हत्येच्या निषेधार्थ नांदेडमध्ये 18 जानेवारीला मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आता हा मोर्चा स्थगित करण्यात आल्याची माहिती सकल मराठा समाजाने आज पत्रकार परिषदेत दिली. बीडमधील घटनाप्रकरणी आत्तापर्यंतच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण होत आहेत. याप्रकरणाच्या तपासावर आम्ही समाधानी आहोत, त्यामुळे हा मोर्चा हा स्थगित केला आहे. मात्र, नांदेडचे पालकमंत्रीपद मुंडे बंधु-भगिनींपैकी कोणालाही नको, जर नांदेडला पालकमंत्री म्हणून मुंडेंना पदभार दिल्यास इथला गोर-गरीब समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच येथील मराठा समाजाच्या समन्वयकांनी दिला आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

यदा कदाचित राज्यातील जनता म्हणत असेल बीडचा बिहार झालाय. पण आम्हाला नांदेडचा बीड होऊ द्यायचा नाही, नांदेड ही मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाते. या राजधानीत सारे गुण्या-गोविंदाने राहतात, त्यामुळे, राज्य सरकारला विनंती आहे की,बीडची संस्कृती नांदेडमध्ये रूजू नये म्हणून पालकमंत्री मुंडे बंधुंना नको. नांदडेचे पालकमंत्री पद मुंडे बंधू किंवा भगिनी कोणालाही नको, असे नांदेडच्या सकल मराठा समाजाचे समन्वयक श्याम पाटील वडजे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, आता पुढील दोन दिवसांत राज्यातील पालकमंत्र्यांची घोषणा होणार असून नांदेडच्या पालकमंत्रीपदी कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन