चांदणी चौक बेकायदेशीर ‘खोदाई’ मुळे 1000 कोटीचा प्रकल्प धोक्यात? सरकारी जागेचीही ‘राजरोस’ खोदाई

0

पुण्याचे पश्चिम द्वार म्हणून नावाजले गेलेल्या चांदणी चौक प्रकल्पाला अनाधिकृत खोदाईची घरघर लागली असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पुणे महानगरपालिका यांच्या चालढकल धोरणाचा फायदा घेत पुणे महापालिकेने ताबा घेतलेल्या चांदणी चौक सर्वे क्र. 20 मध्ये खाजगी मालकाकडून बेकायदेशीर खोदाई केली जात असून शासकीय स्तरावरती कोणीही दखल न घेतल्यामुळे जागामालकाकडून सरकारी जागेचीही ‘राजरोस’ खोदाई केली जात आहे. याबाबत आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे थेट ग्रेडसेपरेटरला पत्रे मारण्याचा ‘भीमपराक्रम’ही संबंधित जागा मालकाकडून करण्यात आलेला आहे. याबाबत माहिती घेताना मालमत्ता उपायुक्त भूसंपादन उपायुक्त बांधकाम विकास विभाग आणि बांधकाम नियंत्रण अशा खात्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यानंतर फक्त आणि फक्त टोलवाटोलवी केली जात असल्याचा धक्कादायक अनुभव येत आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

पुणे महापालिकेच्या वतीने महत्त्वकांक्षी चांदणी चौक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी काही जागा समजुतीने तर काही जागा अवार्डमार्फत घेत या प्रकल्पाचे भूसंपादन केले त्यानंतर 1000 करोड रुपये खर्च करून या भागातील उड्डाणपूल अस्तित्वात आले असले तरीसुद्धा संपादित केलेल्या जागेचा व्यावसायिक वापर करण्याच्या हेतूने मूळ जागामालक चक्क पुणे महापालिकेच्या ताब्यातील जागेवरही पत्रे मारून खोदाई करत आहे. पुणे महापालिकेच्या किमान 9 ते 10 अधिकाऱ्यांना संपर्क केल्यानंतरही याच्यावर कारवाई कोणी करायची यावर एक मत न होणे ही खरी शोकांतिका आहे आणि त्याचाच फायदा घेत व्यावसायिकाकडून राजरोसपणे करोडो रुपये खर्च करण्यात आलेला प्रकल्प धोकादायक स्थितीत आणण्याचे काम केले जात आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

संबंधित जागा मालकाला पुणे महापालिकेमार्फत नियमानुसार योग्य तो मोबदला देखील देण्यात आला आहे. तथापि, सदर प्रकल्पाच्या प्रगतीसाठी संपादित करण्यात आलेल्या जागेचा ताबा महापालिकेकडे असल्याचे अपेक्षित असताना, प्रत्यक्ष पाहणीमध्ये असे दिसून येते की मूळ मालकाने पुन्हा सर्वे क्र. 20 येथील काही जागा चांदणी चौक प्रकल्पांतर्गत ग्रेडसेपरेटर जवळील जागेवर अनधिकृतरित्या ताबा घेतला आहे आणि अतिक्रमण सुरू केले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, पुणे महानगर पालिकेच्या नियमांनुसार संपादित जागा पुन्हा कोणत्याही स्वरूपात मूळ मालकाच्या ताब्यात जाणे किंवा अतिक्रमण होणे हे पूर्णतः बेकायदेशीर आहे. यामुळे महत्त्वाच्या सार्वजनिक प्रकल्पावर अडथळा निर्माण होऊन प्रकल्पाच्या सक्षमतेवर विपरीत परिणाम होत आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

चांदणी चौक हा पुणे शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा भाग असून या भागातून दर दिवशी किमान एक लाख वाहने ये जा करत असतात. संबंधित जागा मालक काही निवडक अधिकाऱ्यांच्या संगनमताने राजरोसपणे हे कृत्य करत असून सर्वे क्र. 20 येथील हे अनाधिकृत खोदाईचे काम न थांबवल्यास राज्य महामार्ग दरड कोसळून बंद होण्याची शक्यता न करता येत नाही. चांदणी चौक प्रकल्पांतर्गत ग्रेड सेपरेटर वाहतूक समस्या सोडवण्यासाठी अत्यावश्यक असून संपादित जागा पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात जात असतानाही महापालिकेकडून जबाबदारी झटकण्याचे काम सुरू आहे. गेल्या तीन महिन्यापासून संबंधित जागा मालकाकडून खोदाई आणि पत्रे मारण्याचे काम सुरू असतानाही यावरती कोणतेही कारवाई करण्यात आली नाही.