पुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींची हजेरी कायम असल्याने राज्यातील कमाल तापमान कमी-जास्त होत आहे. राज्यात गुरुवारी (ता. १६) वादळी वाऱ्यासह पावसाचा; तर अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा दिला आहे. कोकणात उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.राज्यात सर्वाधिक कमाल तापमान जळगाव येथे ४२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पारा ४१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. ढगाळ आकाशामुळे उन्हाचा चटका कमी झाला असून कमाल तापमानात काही ठिकाणी सरासरी इतके नोंदले गेले.
दक्षिण श्रीलंकेजवळ बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून लक्षद्वीप बेटांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
दक्षिण कर्नाटकपासून विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे आगमनास पोषक हवामान होत असल्याने रविवारपर्यंत (ता. १९) अंदमान बेट समूहावर मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
राज्यातही पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह गुरुवारी (ता. १६) पावसाची शक्यता आहे. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात गारपिटीचा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे. उत्तर कोकणात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने आला आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट
• उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट): पालघर, ठाणे, मुंबई, रायगड.
• वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (येलो अलर्ट): अहमदनगर, नाशिक.
वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट): पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.