शहरातील मेढा येथील राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा नवा पुतळा उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा पुतळा २०० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगाला सहज तोंड देईल, असा बनविला असून ऑस्ट्रेलियातील कंपनीकडून याची चाचणी केली आहे. या शिव पुतळ्याच्या लोकार्पणाचा सोहळा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असून वरिष्ठांनी त्या दृष्टीने तयारीत राहावे, अशा सूचना दिल्या असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अजित पाटील यांनी दिली.
नौदल दिनानिमित्त ४ डिसेंबर २०२३ रोजी मेढा राजकोट किल्ला येथे किल्ल्याची पुनर्बांधणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. त्यानंतर अवघ्या आठ महिन्यांत २६ ऑगस्ट २०२४ रोजी पुतळा कोसळला होता. या दुर्घटनेनंतर सरकारने याच ठिकाणी नव्याने शिवपुतळा उभारण्याचे निश्चित केले.
या पुतळ्याच्या कामासाठी ३१ कोटी ७५ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून मे. राम सुतार आर्ट क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत हा पुतळा उभारणी सुरू आहे. यापूर्वीचा शिव पुतळा हा जमिनीपासून चाळीस फूट उंचीचा होता. मात्र, आता नव्याने साकारण्यात येत असलेला शिव पुतळा जमिनीपासून ९३ फूट उंचीचा असणार आहे. त्याची दहा वर्षे देखभाल, दुरुस्ती राम सुतार आर्ट क्रिएशनकडे असणार आहे. स्वतंत्र गुणवत्ता चाचणी पथकाकडून कामाची पाहणी व सर्व चाचण्या घेण्याचे काम करण्यात येत आहे. योद्धाच्या आवेशातील हा शिव पुतळा असून छत्रपतींच्या अंगावर शाल आणि पाठीवर ढाल आहे. या शिव पुतळ्याचे आयुर्मान १०० वर्षे असणार आहे.
व्हिंटेज कंपनीकडून ‘ना हरकत’
पुतळा बसविण्याचे काम सुरू करण्यापूर्वी सुतार यांनी येथील भौगोलिक परिस्थिती जाणून घेतली. मालवण किल्ल्यावर वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने त्यांनी प्रथम छत्रपतींचा अडीच फूट उंचीचा पुतळा तयार करून तो ऑस्ट्रेलियाला पाठवला होता. तेथे असलेल्या व्हिंटेज कंपनीकडून हा पुतळा वाऱ्याच्या वेगाला कशाप्रकारे प्रतिसाद देईल, याची चाचपणी करण्यात आली. या पुतळ्यावर ताशी २०० किलोमीटर वेगाने वारे सोडण्यात आले. त्या वाऱ्यावर पुतळा मजबुतीने उभा राहिला. तसे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ कंपनीकडून देण्यात आले. त्यानंतरच या पुतळ्या बसविण्याच्या कामास सुतार यांच्या कंपनीकडून सुरुवात करण्यात आली. हे सर्व करत असताना पुतळ्याच्या प्रत्येक भागाचे परीक्षण तसेच तपासणी आयआयटी मुंबईकडून करून घेण्यात आली आहे. पुतळ्याचे काम पूर्णत्वास आल्याने येत्या एक मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी या पुतळ्याचे लोकार्पण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
असा आहे पुतळा-
९३ फूट जमिनीपासून उंची
१० मीटर चबुतऱ्याची उंची
६० फूट शिव पुतळ्याची उंची
२३ फूट तलवारीची उंची