‘आमच्या घराच्या चौकटीबाहेर कुणी गेलं नाही. जे चौकटीबाहेर गेले, त्यामुळे कुटुंबामध्ये अस्वस्थता आहे. जे बोलतात त्यांच्यावर भाष्य करणं म्हणजे त्यांना महत्त्व देण्यासारखं आहे. कुटुंब कलहापेक्षा पक्ष महत्त्वाचा आहे’ असं म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयावर भाष्य केलं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची खासगी वाहिनीवर विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये सध्याच्या राजकारणावर शरद पवारांनी परखड मतं व्यक्त केली.






‘आम्हाला दोन गोष्टींची आम्हाला चिंता आहे. देशाचं संविधान आणि जीवनातल्या सुसंस्कृतपणाची चिंता. ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. शेतीखात्याचा अभ्यास केला तर वस्तुस्थिती समोर येईल. कृषीमंत्री झालो तेव्हा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना भेटलो. कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला. 2014 नंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाली, असा आरोपही शरद पवारांनी केंद्र सरकारवर केला.
‘कुटुंब कलहापेक्षा पक्ष महत्त्वाचा’
‘बारामतीच्या लोकांना विचारा विकास कुणी केला? 1971 सालचा दावा करतात ते तेव्हा कुठे होते? सगळ्यांना माहीत आहे की संस्था कुणी चालवल्या. आमच्या घराच्या चौकटीबाहेर कुणी गेलं नाही. जे चौकटीबाहेर गेले, त्यामुळे कुटुंबामध्ये अस्वस्थता आहे. जे बोलतात त्यांच्यावर भाष्य करणं म्हणजे त्यांना महत्त्व देण्यासारखं आहे. कुटुंब कलहापेक्षा पक्ष महत्त्वाचा आहे, असं म्हणत पहिल्यांदाच शरद पवारांनी अजितदादांच्या निर्णयाबद्दल भूमिका स्पष्ट केली.
‘…तर सुप्रिया मंत्री झाली असती’
‘माझी मुलगी तीन वेळा निवडून आली. सुप्रिया जनतेच्या प्रेमामुळे खासदार आहे. प्रफुल्ल पटेलांचं नाव मी मंत्रिपदासाठी दिलं, सुप्रियाचं दिलं नाही. संगमांच्या मुलीला मंत्रिमंडळात घेतलं, सुप्रियाला घेतलं नाही. पुत्रिमोह असता तर खासदार सुप्रिया मंत्री असती, असंही पवार म्हणाले.
‘सगळी लोक चौकशांनी अस्वस्थ झाले होते’
‘पक्ष सोडून वेगळ्या विचारधारेनं जायचा काहींचा टोकाचा निर्णय घेतला. आम्ही भाजपविरुद्ध लढलो आणि त्यात यश आलं. काही लोकांनी माझ्याशी भाजपबाबत चर्चा केली. हे सगळी लोक चौकशांनी अस्वस्थ झाले होते. केंद्र सरकार चौकशीची सगळी आयुधं वापरत होते. त्याविरोधात आम्ही भक्कमपणे उभे राहिलो. मला नोटीस आल्यावर म्हणालो, मी ईडी कार्यालयात येतो. मी येतो म्हटल्यावर ईडीचे अधिकारी म्हणाले तुम्ही येऊ नका, असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांच्या भाजप प्रवेशावर भाष्य केलं.
सांगत उद्धव ठाकरेंना कुणी मुख्यमंत्री केलं?’
‘आम्ही भाजपमध्ये जाणार या फक्त चर्चा होती. भाजपसोबत जायला तयार होऊ अशी स्थिती कधीही आलेली नाही. जेव्हा महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री कुणाला करायचं असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी उद्धव ठाकरेंचा हात मी धरला आणि सगळ्यांनी अनुमोदन दिलं’ असं सांगत उद्धव ठाकरेंना मीच मुख्यमंत्री केलं असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं.
‘जरांगेंच्या पाठीशी आमचा हात नाही’
‘मराठा आरक्षणाची मागणी चुकीची नाही. ईडब्ल्यूएसच्या काही मर्यादा आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न कायमचा सोडवावा. मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला पण कोर्टात टिकला नाही. धनगर आरक्षणाचा निर्णय या सरकारनं अजून घेतलेला नाही. आरक्षणाचा प्रश्न संपवण्यासाठी संसदेत निर्णय घ्यावा लागेल. मनोज जरांगे प्रकरणात आमचा काहीही हात नव्हता, असं पवारांनी स्पष्ट केलं.
‘…म्हणून वंचित आघाडी सोबत आली नाही’
‘वाटाघाटीत ठरलेला निर्णय भाजपनं पाळला नाही म्हणून उद्धव ठाकरेंना वेगळी भूमिका घ्यावी लागली होता. यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा सुरू होती. त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बैठक झाली. ‘वंचित’ने आमच्याकडे 16 जागांची मागणी केली. ‘वंचित’नं मागितलेल्या जागा देणं आम्हाला शक्य नव्हतं, असं सांगत वंचित आघाडी महाविकास आघाडीमध्ये का सामील झाली नाही, या प्रश्नाचं उत्तर पवारांनी दिलं.
‘यशवंत चव्हाणांना भारतरत्न’
‘वन नेशन, वन इलेक्शन’ व्यवहार्य नाही. बंगालची निवडणूक महाराष्ट्रासोबत शक्य नाही. यशवंतराव चव्हाणांचं देशासाठी प्रचंड योगदान आहे. चव्हाणांना ‘भारतरत्न’च्या निर्णयाचं स्वागतच करू, असं म्हणत पवारांनी चव्हाणांच्या भारतरत्नाची मागणी केली.
राममंदिरात सीतेची मूर्ती का नाही?
राम मंदिराचं भव्य लोकार्पण झालं. विरोधकांनाही याचं निमंत्रण होतं. पण या कार्यक्रमाला भाजपसह अनेक नेते हजर होते. मी याधाही याबद्दल बोललो आहे, राम मंदिरात मी माझ्या सोयीनं जाईन. मी आजच पंढरपुरला जाऊन आलो. राममंदिरात सीतेची मूर्ती का नाही अशी लोकांमध्ये चर्चा आहे, असा सवाल पवारांनी उपस्थितीत केला. ‘देशाचा प्रधानमंत्री हा देशाचा असतो, तो एका धर्माचा नसतो. मूलभूत प्रश्न बाजूला, धर्मांध वृत्तींना प्रोत्साहन मिळेल अशा गोष्टी आहे. हे देशाच्या ऐक्याला अतिशय घातक आहे. बारामतीच्या राजकारणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे, असंही पवार म्हणाले.











