वारीच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोचा विक्रमी प्रवास – दोन दिवसांत ५.४५ लाख प्रवाश्यांनी केला प्रवास

0
1

पुण्यात संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळे प्रमुख रस्ते बंद असतानाच पुणे मेट्रोने प्रवाशांच्या संख्येत विक्रमी वाढ नोंदवली आहे. २० आणि २१ जून या दोन दिवसांत तब्बल ५.४५ लाख प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला, अशी माहिती पुणे मेट्रो प्रशासनाने दिली.

शुक्रवार (२० जून) रोजी पुणे मेट्रोने ३,१९,०६६ प्रवाशांची विक्रमी एकदिवसीय वाहतूक केली.

  • लाइन 1 (पीसीएमसी ते स्वारगेट): १,५०,३८५ प्रवासी
  • लाइन 2 (वनाज ते रामवाडी): १,६८,६८१ प्रवासी

शनिवारी (२१ जून) ही प्रवासीसंख्या जरी थोडी घटली तरीही ती सरासरीच्या दुप्पट होती — २,२६,६०० प्रवासी.

  • लाइन 1: १,१३,३६६
  • लाइन 2: १,१३,२३४
अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

पुणे शहरात वारी मिरवणुकीमुळे मध्यवर्ती भागांतील रस्ते, तसेच पिंपरी-चिंचवडशी जोडणारे रस्ते बंद होते. परिणामी अनेक वारकरी आणि नागरिकांनी मेट्रोचा वापर केला. पेठ भागांमध्ये खासगी वाहने बंद असल्याने सार्वजनिक वाहतूकच एकमेव पर्याय ठरली.

पुणे मेट्रोचे जनसंपर्क संचालक हेमंत सोनवणे यांनी सांगितले, “खूपशा वारकऱ्यांनी आणि नागरिकांनी यावेळी मेट्रोचा वापर केवळ गरजेपोटीच नाही, तर पहिल्यांदाच मेट्रोचा अनुभव घेण्यासाठीही केला.” यंदा सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट हा नवीन टप्पा सुरू झाल्याने अनेक वारकरी आणि स्थानिकांनी त्याचा फायदा घेतला.