पुणे, ९ जून – बकरी ईदनंतरच्या दुसऱ्या दिवशी ‘बासी ईद’ निमित्त मुस्लिम समाजाच्या कुटुंबांनी सारसबाग परिसरात भेट देण्याची परंपरा असताना, यंदा पुणे महानगरपालिकेने हा बाग बंद ठेवल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. या कृतीचा निषेध करत मुस्लिम सत्यशोधक मंडळ या संस्थेने आज एक अधिकृत पत्रकाद्वारे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या निर्णयामागे पुण्यातील राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या पत्राचा हवाला देण्यात आला आहे. त्या पत्रात ‘मुस्लीम समाज बासी ईदला सारसबागेत मांसाहार करतो’ अशा गैरसमजातून धार्मिक तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने बाग बंद ठेवावी, अशी शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर PMC प्रशासनाने संबंधित दिवशी सारसबाग बंद ठेवला.
या कृतीविषयी मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी म्हटले की, “हे केवळ मुस्लिम समाजाच्या नागरी हक्कांवर गदा आणणारे असून, अशा कृतीमुळे अस्पृश्यतेसारखा अमानवी विचार पुन्हा जन्म घेत आहे.”
मंडळाने स्पष्ट केले की, रमजान आणि बकरी ईद हे मुस्लिम समाजाचे दोन प्रमुख सण असून, स्वयंपाकातील मेहनतीनंतर कुटुंबे बागा, सिनेमा गृह आणि इतर करमणुकीच्या ठिकाणी जातात. यावर बंदी घालणे ही फक्त धार्मिक स्वतंत्रतेच नव्हे तर घटनात्मक हक्कांचीही पायमल्ली आहे.
“जर मांसाहारामुळे मंदिर परिसराचे पावित्र्य भंगत असेल, तर सर्वसमाजासाठी तो नियम असावा; केवळ मुस्लीम समाजासाठीच का?” असा सवालही मंडळाने उपस्थित केला. या प्रकारावर मंडळाने खेद व्यक्त करत सांगितले की, या कृतीमुळे केवळ अपमान नव्हे तर मुस्लीम समाजाच्या भारतीयत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. त्यामुळे “बासी ईदला सारसबाग बंद ठेवण्याचा निर्णय हा संतापजनक असून आम्ही याचा सखेद निषेध करतो,” असे मंडळाने ठामपणे सांगितले आहे.