पवारांना सोडताच प्रशांत जगतापांचा पक्ष अन् 2029 चे मोठे लक्ष्य ठरल; मुंबईत यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश?

0

राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चेमुळे नाराज झालेले पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार ) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आता नव्या राजकीय वाटेवर निघाले आहेत.बुधवारी आपल्या पदाचा त्याग केल्यानंतर, जगताप यांनी आज थेट मुंबईची वाट धरली असून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवारांची साथ सोडल्यानंतर जगताप नक्की कुठे जाणार, यावर गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची चिन्हे आहेत.

अजित पवार आणि शरद पवार यांच्यात सुरू असलेल्या जवळीकीच्या चर्चांमुळे प्रशांत जगताप अस्वस्थ होते. पुरोगामी विचारांशी तडजोड नको, या भूमिकेतून त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. ‘मी आगामी महापालिका निवडणूक लढवणार असून माझ्या पुढील वाटचालीचा निर्णय लवकरच जाहीर करेन,’ असे सूचक विधान त्यांनी राजीनामा देताना केले होते.

अधिक वाचा  पुण्यातील बाहुबली माजी नगरसेवकांचे भाजप पक्षप्रवेश; 22 माजी नगरसेवकांच्या हाती ‘कमळ’ या प्रभागात गणिते बदलली

प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या दोन्ही पक्षांकडून आमंत्रणे आली होती. मात्र, राजकीय गणिते आणि वैचारिक भूमिका पाहता त्यांनी काँग्रेसला पसंती दिल्याचे समजते. पुण्यात भाजपविरोधात प्रबळ लढा देण्यासाठी काँग्रेस हाच योग्य पर्याय असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

या नेत्यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश?

योगायोगाने, आज मुंबईतील काँग्रेस भवनात पुणे महापालिका निवडणूक आणि जागावाटपा संदर्भात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी पुण्याचे प्रभारी सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांच्यासह पुण्यातील स्थानिक नेते उपस्थित आहेत. याच बैठकीच्या दरम्यान प्रशांत जगताप मुंबईत दाखल झाल्याने त्यांचा पक्षप्रवेश निश्चित मानला जात आहे. काँग्रेसमधील सूत्रांनी देखील जगताप यांच्याशी चर्चा झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पुण्याच्या राजकारणातील हा मोठा बदल आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची समीकरणे कशा प्रकारे बदलणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.

अधिक वाचा  अजितदादांची ही खेळी पुणेरी राजकारणात मोठी उलथापालथ; 3 पक्षात वादाचा भडका आणि भाजपाची ही गणिते बिघडली आत्ता दुरंगी लढती शक्य