माझ्या राजकारणाची सुरुवात श्री छत्रपती कारखान्यापासूनच झाली. त्यामुळे हा कारखाना माझ्याशी भावनिक दृष्ट्या जोडलेला आहे. ‘छत्रपती’ हा आपला परिवार आहे. शेतकरी सभासदांचे नुकसान होणार नाही, याची काळजी संचालक मंडळ घेईल. यासाठी आपण स्वतः आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे देखील कमी पडणार नाहीत, हा शब्द देतो, अशी भावनिक साद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घातली.






भवानीनगर येथील श्री छत्रपती कारखान्याच्या गळीत हंगामाची सुरुवात उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, “‘छत्रपती’ला जुने दिवस आणण्यासाठी संचालक मंडळाला मेहनत करावी लागणार आहे. वेळप्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतील. अधिकारी, कामगारांनीदेखील जबाबदारीचे भान ठेवून काम करावे. त्यानंतरच शेतकऱ्यांना चांगला दर देणे शक्य होईल. कारखान्याचा दर कमी होता, तरीदेखील माझ्या शेतातील ऊस ‘छत्रपती’लाच दिला. कार्यक्षेत्रात ऊस वाढवावा लागेल. त्यासाठी ‘एआय’ची मदत घेणार असल्याचे” उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
केंद्राचा सहकारी साखर कारखानदारी ‘प्रोत्साहन भत्ता’ ४० हजार कोटींचा निधी
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्त दर मिळावा आणि सहकारी साखर कारखानदारीला प्रोत्साहन देण्याचा केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा मानस असून, त्यासाठी साखर कारखान्यांसाठी विविध प्रकल्पांसाठी ४० हजार कोटींचा निधी उभारणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. भवानीनगर येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. पवार म्हणाले, नुकत्याच राज्याच्या दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. अमित शहा हे केंद्राचे सहकार विभागाचे प्रमुख आहेत. देशातील फक्त सहकारी साखर कारखान्यांसाठी हा प्रस्ताव आहे; खासगी कारखान्यांसाठी नाही.
‘छत्रपती’सह माळेगाव आणि सोमेश्वर कारखान्यासह राज्यातील कारखान्यांना देखील विचारणा केली जाणार आहे. या कामासाठी अमित शहा सहकार विभागाला १० हजार कोटी रुपये देणार आहेत, तसेच ३० हजार कोटी रुपये विविध बँकाकडून कमी व्याजदराने उभारणार आहेत. ही ४० हजार कोटी रुपयांची रक्कम देशातील सहकारी साखर कारखान्यांना कर्ज, डिस्टिलरी आणि विविध प्रकल्पांसाठी देण्याचा प्रस्ताव आहे. यात राज्याकडून एक रुपयाचीही गुंतवणूक करायची नाही, मात्र त्यांचा ‘शेअर’ असणार आहे. शेतकऱ्यांना जास्त दर देण्यासाठी मार्केटमध्ये जे नवीन आहे ते उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे म्हणाले, “सभासदांनी आपला कारखाना काटा करण्याचे पाप कधीच करणार नाहीत. कारखान्याचा दर निश्चितपणे चांगला राहील. ‘छत्रपती’लाच ऊस गाळपासाठी द्यावा. हा कारखाना आपली सर्वांची ‘आई’ आहे. तिची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. या कारखान्याने अनेक गोष्टी शिकविल्या, या मातीने आम्हाला घडविल्याची जाण आहे. राजकारणात काम करताना त्याचा उपयोग होतो,” असे भरणे म्हणाले.
सोनं वजन केलं तरी बिनचूक वजन होईल: चेअरमन जाचक
यावेळी चेअरमन पृथ्वीराज जाचक म्हणाले, “कारखान्याची ट्रायल सुरू असतानाच ५ लाख युनिट वीज निर्यात करण्याची किमया अधिकारी आणि कर्मचारी यांनी केली. सभासदांनी ऊस गाळपासाठी आपल्याच कारखान्याला द्यावा. ऊस गाळप नोंदणीनुसारच पारदर्शकपणे होईल. कोणाचीच वशिलेबाजी होणार नाही. सोनं वजन केलं तरी बिनचूक वजन होईल. जुने दिवस आणण्यासाठी चांगले वातावरण आहे. सभासदांनी निर्धोकपणे ऊस द्यावा,” असे आवाहन जाचक यांनी केले. यावेळी सारीका भरणे, उपाध्यक्ष कैलास गावडे, आप्पासाहेब जगदाळे, प्रशांत काटे, पृथ्वीराज घोलप, शिवाजी निंबाळकर आदी संचालक उपस्थित होते.
“मिळालेली पदे मिरवण्यासाठी नसतात, तर त्यांचा उपयोग सर्वसामान्यांसाठी करण्याची अजित पवार यांची शिकवण आहे. त्यानुसार आम्ही काम करतो. काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केल्याने त्यांना माणसं आयुष्यभर विसरणार नाहीत. आपल्या कृषिमंत्रीपदाच्या काळातच हा निर्णय झाल्याचे मोठे समाधान आहे,” असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.












