राज्यात बळीराजाची थट्टा सुरूच!  नुकसान भरपाईपोटी दिले ३, ५, ८,२१ रुपये धनादेश सरकारला परत शेतकरी संतापले

0

अतिवृष्टी आणि महापुरामुळे राज्यातला शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेते आंदोलन करत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांची थट्टा करणारा प्रकार आता समोर आला आहे. अकोल्यातली काही शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई म्हणून फक्त ३, ५, ८ आणि २१ रुपये अशी मदत देण्यात आलीय. थट्टा करणाऱ्या या नुकसानभरपाईच्या मदतीनंतर संतापलेल्या शेतकऱ्यांनी त्या रकमेचे धनादेश पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना परत केले आहेत.

पंतप्रधान पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली. यात काही शेतकऱ्यांना फक्त ३ रुपये ते २१ रुपयांपर्यंतची रक्कम मिळाली आहे. पीक बुडालेल्या आणि जमीन खरवडून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी ही रक्कम थट्टाच करणारी आहे. यावरून संताप व्यक्त करताना शेतकऱ्यांनी मिळालेली मदत ही तुटपुंजी आणि अपमानास्पद असल्याचं म्हटलंय.

अधिक वाचा  दिवाळीचा पुणे मेट्रोला ‘झटका’! आर्थिक गणित बिघडले प्रवासी संख्या २.३६ लाखांवरून थेट १२ हजारांवर

अकोला जिल्ह्यातल्या दिनोडा गावातील २० ते २५ शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतून मिळालेल्या रकमेचे धनादेश सरकारला परत केले. आता तरी सरकारनं शेतकऱ्यांची थट्टा करणं थांबवावं अशी विनंती या शेतकऱ्यांनी सरकार दरबारी केलीय.

पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यात येतं. या योजनेचा हफ्ता केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित भरतं. नव्या नियमानुसार काही पिकांसाठी विमा हफ्त्याचे दर बदलले असून पीक पाहणी बंधनकारक करण्यात आलीय. राज्यात २०१६ पासून पंतप्रधान पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई देण्यात येते.

अधिक वाचा  हवामान विभागाकडून नकोसा इशारा जारी…अवकाळीचा वादळी मारा सोसण्यासाठी तयार राहा!