हातावर ‘रि’ अन् चारपानी तक्रारीत ९ वेळा ‘री’ या एका वेलांटीवरुन डॉक्टर युवतीची हत्या की आत्महत्या? मृत्यू प्रकरण उलगडण्याची शक्यता

0

फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या युवती डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाचे अनेक धागेदोरे पुढे येत आहेत. मुळात ही आत्महत्या आहे की हत्या? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात आणखी एक नवीन मुद्दा उपस्थित केला आहे.

बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, युवती डॉक्टरने लिहिलेलं चार पानी पत्र आणि हातावरची सुसाईड नोट या दोन्हींमधलं हस्ताक्षर जुळत नाही. त्यांनी चार पानी पत्रामध्ये ९ वेळा पोलिस निरीक्षक हा शब्द वापरला आहे. प्रत्येकवेळी त्यांनी ‘री’ हे अक्षर दीर्घ लिहिलं. मात्र हातावर जेव्हा पोलिस निरीक्षक शब्द वापरला तेव्हा मात्र ‘रि’ ऱ्हस्व लिहिला आहे.

अधिक वाचा  सांगलीत काय घडतंय? रात्रीत साखर कारखान्याचे नाव बदलून जत संस्थानच्या राजाच्या नावाचा फलक; आमदार पडळकरांनी दिला होता इशारा

अंधारे म्हणाल्या, इतरही काही शब्द जुळत नाहीत. त्यामुळे मृत युवतीची बदनामी करणाऱ्या चाकणकर लोकांच्या सुपाऱ्या वाजवत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतोय. ही आत्महत्या आहे की हत्या? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण

दरम्यान, सुषमा अंधारे यांनी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा दाखला दिला. वर्ष २०१६च्या शेवटी अश्विनी बिद्रे यांची हत्या झाली होती. परंतु गुन्ह्याचा उलगडा होण्यास २०१७चा जानेवारी महिना उजाडला. तोपर्यंत त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले होते. या प्रकरणात आरोपी अभय कुरुंदकर यानेच अश्विनी यांच्या मोबाईवरुन त्यांच्या ‘मेव्हण्याला हाऊ आर यू’ असा मेसेज केला होता. अश्विनी ह्या जिवंत आहेत, असं भासवण्यासाठी त्याने असा प्रयत्न केला. मात्र या मेसेजमध्ये त्याने यूच्या ऐवजी वाय लिहिलं होतं. इथेच त्याचं बिंग फुटलं आणि प्रकरणाचा उलगडा झाला. याही प्रकरणात असाच संशय आहे, असं अंधारे म्हणाल्या.

अधिक वाचा  स्थानिकच्या मतदानापूर्वी ‘लाडक्या’ बहिणींस २ हप्ते? राज्यात १५ नोव्हेंबरपूर्वी निवडणुक आचारसंहितेची शक्यता