पुण्यातील गुंड निलेश घायवळ प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. घायवळच्या अटकेच्या हालचालींना वेग आला असतानाच आता या प्रकरणात ईडीची एन्ट्री होणार असल्याची माहिती आहे. पुणे पोलिस लवकरच अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) तपासासाठी पत्र पाठवणार आहे. दरम्यान, निलेश घायवळ हा लंडनमध्येच असल्याची माहिती पुणे पोलिसांना युके हाय कमिशनने दिली आहे. युकेमध्ये निलेश घायवळ कुठे लपून बसला आहे, याची माहिती युके पोलिस पुणे पोलिसांना देणार आहेत.






निलेश घायवळ यांचा मुलगा लंडनमध्ये शिकत असल्याने तो लंडनमध्ये असल्याची माहिती युके हायकमिशनने पुणे पोलिसांना दिली आहे. निलेश घायवळबाबत तपास करण्यासाठी स्थानिक पोलिसांना कळवले असल्याची माहिती युके हाय कमिशनने दिली आहे. ६ फेब्रुवारी २०२६ पर्यंतचा निलेश घायवळचा युकेमधील व्हिसा आहे.
पुणे पोलिसांनी निलेश घायवळ याच्या घरावर छापेमारी केली होती. यात त्यांना अनेक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, 10 तोळे सोनं, 3 दुचाकी आणि 1 स्कॉर्पिओ गाडी आढळली आहे. पुणे, अहिल्यानगर, धाराशिवमधील 40 जमिनींचे 7/12, पवनचक्की प्रकल्पाशी संबंधित फाईल्स आढळून आल्या आहेत. त्याने एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावून 10 फ्लॅट बळकावल्याचेही पोलिसांनी सांगितले.
निलेश घायवळ आणि त्याचा भाऊ सचिन घायवळच्या खरेदी विक्रीच्या व्यवहाराची चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. याच चौकशीनंतर घायवळच्या कुटुंबियांची 10 बँक खाती गोठवली आहे. इतर व्यवहारांची चौकशीही सुरु करण्यात आली आहे.












