काळेपडळमध्ये ब्लॅकमेलिंग व अ‍ॅसिड हल्ल्याचा प्रयत्न करणारा गुन्हेगार जावेद नबी अटकेत

0

काळेपडळ पोलीस ठाण्याच्या पथकाने एका गंभीर प्रकरणात मोठी कारवाई करत जावेद नबी या कुख्यात फसवेखोराला अटक केली आहे. एका महिलेचे आक्षेपार्ह मॉर्फ केलेले फोटो वापरून ब्लॅकमेल करून लैंगिक शोषण करणाऱ्या या गुन्हेगाराने पीडितेवर अ‍ॅसिड हल्ल्याचा प्रयत्नही केल्याचे उघड झाले आहे.

पोलीस तपासात हेही समोर आले की, या गुन्ह्यात त्याची पत्नी शायस्ता नबी हिचाही सक्रिय सहभाग असून, तिने अनेकवेळा पतीला वाचवण्यासाठी पीडित महिलांना धमकावले आहे.

जावेद नबी याने याआधीही राहेेजा गार्डन (फेज ३) व अर्चना पॅराडाईज सोसायटीतील महिलांना त्रास दिला असून, या घटनांमध्येही शायस्ता नबी सोबत होती व तिने तक्रार न करण्यासाठी महिलांना धमकावले.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनसिंग पाटील (काळेपडळ पोलीस ठाणे) यांनी सांगितले, “महिलांनी अशा फसवेखोरांपासून घाबरू नये. पोलिसांवर विश्वास ठेवावा. तक्रारदारांचा गोपनीयता हमीने राखली जाईल. अशा आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”

पीएसआय अनिलराजे निंबाळकर, या प्रकरणाच्या तपासाचे नेतृत्व करत असून, त्यांनीही महिलांना पुढे येण्याचे आवाहन केले. “त्रास सहन करत शांत राहणे योग्य नाही. प्रत्येक महिलेनं निडरपणे तक्रार द्यावी.”

पीडित महिलेचे वडील, जे भारतीय सैन्याचे निवृत्त अधिकारी आहेत, यांनी संतप्त प्रतिक्रिया देत सांगितले, “अशा गुन्हेगारांना भारतीय न्याय संहिता, अ‍ॅसिड हल्ला प्रतिबंधक कायदा आणि सायबर क्राइम कायद्यांतर्गत कडक शिक्षा झाली पाहिजे. हे प्रकरण इतर पीडित महिलांसाठी उदाहरण बनले पाहिजे.”

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

जावेद नबी याच्यावर अनेक महिलांना त्रास देण्याचे गंभीर आरोप आहेत. त्याच्याविरुद्ध सायबर गुन्हा, अ‍ॅसिड हल्ल्याचा प्रयत्न, लैंगिक छळ, धमकी व ब्लॅकमेलिंग या अनेक कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांचा तपास सुरू असून आणखी काही पीडित महिला पुढे येण्याची शक्यता आहे.

महत्वाचे –

  • महिलांनी अशा प्रसंगी भीती न बाळगता पोलिसांशी संपर्क साधावा.
  • पोलिसांकडून पूर्ण गोपनीयता राखली जाईल.
  • सायबर गुन्हेगारी आणि लैंगिक छळाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.