मुंबई : पश्चिम आशियात इराण आणि इस्रायल यांच्यातील तणावपूर्ण संबंध सध्या मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यातून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या संघर्षाचा थेट परिणाम जरी त्या देशांपुरता मर्यादित वाटत असला, तरी जागतिक व्यापार, तेलवहन मार्ग, खतांची आयात, आणि कृषी उत्पादन यावर त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. भारतासाठी ही परिस्थिती काळजीची बाब आहे, विशेषतः जेव्हा अर्थव्यवस्था, शेती आणि महागाई दर या सर्व घटकांवर जागतिक घडामोडींचा मोठा परिणाम होतो.
कृषी क्षेत्रावर होणारा परिणाम खतांच्या आयातीत अडथळा
भारत मोठ्या प्रमाणावर इराण आणि अन्य खाडी देशांतून नत्र, स्फुरद, आणि पोटॅशयुक्त खतं आयात करतो. इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध होऊ लागल्यास, खतांच्या पुरवठ्याच्या वाहतुकीवर परिणाम होईल. यामुळे भारतातील शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य दरात खतं मिळणं कठीण जाऊ शकतं, ज्याचा थेट परिणाम खरीप हंगामाच्या उत्पादकतेवर होऊ शकतो.
कच्च्या तेलाचे दर वाढणार
भारताचा बहुतांश कच्चा तेल पुरवठा खाडी देशांतून होतो. युद्धजन्य परिस्थितीमुळे तेलवाहतूक मार्ग धोक्यात येतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढू शकतात. याचा परिणाम शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या डिझेलच्या दरावर होतो. ट्रॅक्टर, पंपसेट, वाहतूक खर्च वाढल्याने शेतीचा एकूण खर्च वाढतो.
महागाईत वाढ
खत, बियाणं, इंधन यांचे दर वाढल्याने उत्पादन खर्च वाढेल. परिणामी शेतीमालाचा दरही वाढेल आणि महागाईचा फटका सर्वसामान्य ग्राहकांवर बसेल.
अन्य क्षेत्रांवरील परिणाम
औद्योगिक उत्पादनावर परिणाम
भारतातील अनेक औद्योगिक क्षेत्रांत कच्च्या मालाच्या आयातीत इराणचा सहभाग आहे. पेट्रोकेमिकल, स्टील, आणि औषधनिर्मिती क्षेत्रातील पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते.
विदेशी गुंतवणुकीवर परिणाम
अशांततेचे वातावरण असताना जागतिक गुंतवणूकदार सावध राहतात. शेअर बाजारात अनिश्चितता वाढते. भारतीय रुपया कमकुवत होतो,परिणामी आयात महाग होते.
भाज्या आणि फळांची निर्यात प्रभावित
भारत पश्चिम आशियातील अनेक देशांना कांदे, केळी, डाळिंब यांसारखे कृषी उत्पादने निर्यात करतो. युद्धामुळे हे मार्ग बंद पडल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो.