स्थानिकच्या मतदानापूर्वी ‘लाडक्या’ बहिणींस २ हप्ते? राज्यात १५ नोव्हेंबरपूर्वी निवडणुक आचारसंहितेची शक्यता

0

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल १५ नोव्हेंबरपूर्वी वाजणार आहे. या दरम्यान आचारसंहितेची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुमारे दोन कोटी लाभार्थींना ऑक्टोबर व नोव्हेंबरचा हप्ता देण्याचे नियोजन सुरू आहे. त्यावरील निर्णय याच आठवड्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आणली. त्यासाठी राज्यभरातील अडीच कोटी महिलांनी अर्ज केले आणि त्यांना १ जुलै २०२४ पासून लाभ देण्यात आला. निवडणुकीच्या प्रचारात लाडक्या बहिणींना दीड हजारांऐवजी २१०० रुपये देण्याचीही ग्वाही देण्यात आली. ही योजना महायुतीसाठी ‘गेम चेंजर’ ठरली. आता नोव्हेंबर ते जानेवारी या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात ३२ जिल्हा परिषदा, ३३१ पंचायत समित्या, २८९ नगरपालिका व २९ महापालिका आहेत.

अधिक वाचा  राज्यात बळीराजाची थट्टा सुरूच!  नुकसान भरपाईपोटी दिले ३, ५, ८,२१ रुपये धनादेश सरकारला परत शेतकरी संतापले

पुढे फेब्रुवारीत १४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींच्याही निवडणुका होतील. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींची नाराजी विरोधकांच्या पथ्यावर पडू शकते. दरम्यान, लाडक्या बहिणींना ई-केवायसीमुळे दिवाळीतही ऑक्टोबर महिन्याचा लाभ मिळाला नव्हता. आता आचारसंहिता लागणार असल्याने नोव्हेंबरचाही हप्ता न मिळाल्यास महिलांची नाराजी वाढू शकते. त्यामुळे लाभार्थींना दोन्ही महिन्याचा लाभ एकत्रित दिला जाऊ शकतो, जेणेकरून योजनेतील महिला नाराज होणार नाहीत, हा त्यामागील हेतू असणार आहे.

‘ई-केवायसी’साठी मिळणार मुदतवाढ

लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक लाभार्थींना https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ई-केवायसी करावी लागणार आहे. त्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित लाभार्थींसाठी १८ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. पण, स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ई-केवायसीची मुदत आणखी काही दिवस वाढू शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

अधिक वाचा  महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण दुर्देवी न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार

लाडकी बहीण योजनेची स्थिती

सध्याचे अंदाजे लाभार्थी

२.१० कोटी

दरमहा अपेक्षित निधी

३,१५० कोटी

दोन महिन्यांसाठी निधी

६,३०० कोटी

‘ई-केवायसी’ची मुदत

१८ नोव्हेंबर

ई-केवायसी केल्यास पुढे नियमित मिळेल लाभ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थींनी ६० दिवसांत ई-केवायसी करावी, असे शासनाचे आदेश आहेत. ई-केवायसीनंतर पात्र लाभार्थींचा लाभ पुढे नियमित सुरु राहील. आचारसंहिता लागू झाल्यावर निवडणुका संपेपर्यंत लाभ देता येणार नाही. त्यामुळे आचारसंहितेपूर्वी पात्र लाभार्थींना योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यासाठी सर्व लाभार्थींनी ई-केवायसी करून घ्यावी.

– जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, सोलापूर

अधिक वाचा  दिवाळीचा पुणे मेट्रोला ‘झटका’! आर्थिक गणित बिघडले प्रवासी संख्या २.३६ लाखांवरून थेट १२ हजारांवर