दिवाळीच्या संपूर्ण आठवड्यात मेट्रोच्या प्रवासी संख्येत मोठी घट झाली आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी फक्त ५२ हजार प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला तर इतर दिवसांची प्रवासी संख्या देखील सरासरी १३ ते १४ हजार राहिली. त्यामुळे मेट्रोला मोठा आर्थिक झटका बसला आहे. आजपासून मेट्रो प्रवासी संख्येत काहीशी वाढ होऊ लागली आहे. दिवाळीत शिक्षण व कामासाठी शहरात आलेल्या नागरिकांपैकी बहुतांश नागरिक गावी जात असतात. शाळा महाविद्यालये व कार्यालयांना सुट्टी असते.






यामुळे शहरांतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेंतर्गत प्रवासी संख्या घटते. यानुसार स्थानिक पातळीवर पीएमपीएमएल आणि मेट्रो सेवेच्या प्रवाशी संख्येत घट झाली आहे. शैक्षणिक संस्था, सरकारी व खासगी कार्यालये बंद असल्याने या सेवांचा वापर मोठ्या प्रमाणात घटला. परिणामी यावर्षी मेट्रोच्या प्रवासी संख्येत घट झाली पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या २ लाख ३६ हजारांवरून अवघ्या १२ हजारांवर आली. धनत्रयोदशीपासून मेट्रो प्रवासी संख्येत घट होण्यास सुरूवात झाली आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रवासी संख्येने निच्चांक गाठला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे मंगळवारी फक्त ५२, ४८२ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला.













