कुणाल वेडेपाटीलांचा ‘आरोग्यधन’ स्तुत्य उपक्रम; प्रभाग 10 सामाजिक बांधिलकीचे दर्शन ७२४६ उत्स्फूर्त प्रतिसाद

७,२४६ नागरिकांची आरोग्य तपासणी ४२३ महिलांची कर्करोग तपासणी चष्मा वाटपाचा २,०८३ नागरिकांना लाभ २६३ ज्येष्ठ नागरिक सहाय्यक उपकरणे वाटपास नोंदणी

0

राष्ट्रवादी युवक काँग्रेस, खडकवासलाचे मा. अध्यक्ष कुणालआबा वेडेपाटील यांच्या पुढाकाराने आणि लक्ष्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रोशन मराठे यांच्या मोलाच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक १०- भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, भारतीनगर, बावधनमधील नागरिकांसाठी आयोजित केलेले ‘आरोग्यधन- मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर’ यशस्वीरित्या पार पडले.

रविवार, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान, भुसारी कॉलनी, पौड रोड, कोथरूड येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला. या भव्य उपक्रमात हृदयरोग, कर्करोग, किडनी, नेत्र (डोळे), दंतरोग, अस्थिव्यंग (हाडांच्या शस्त्रक्रिया) यांसारख्या विविध गंभीर आजारांची तपासणी व मोफत शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात आली.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री अजितदादा पवार यांच्या प्रेरणेने कुणालआबा वेडेपाटील यांनी हा उपक्रम हाती घेतला होता. ज्यातून सामान्य नागरिकांना आरोग्य सेवा सहज उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी आयोजकांना परिसरातील मान्यवरांची भक्कम साथ लाभली. याप्रसंगी माजी सभागृह नेते शंकर केमसे, उद्योजक अभयदादा मांढरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला विधानसभा अध्यक्ष बाबा धुमाळ, माजी नगरसेविका सायलीताई वांजळे, माजी उपसरपंच दीपक दगडेपाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत भुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री.मिलिंद वालवडकर, शिवसेना नेते अविनाशजी दंडवते तसेच अभिजीत दगडेपाटील, धनंजय दगडेपाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

या एकदिवसीय शिबिरात प्रभाग क्रमांक १० मधील विविध सोसायट्यांमधील नागरिकांचा सहभाग आणि लाभलेली आरोग्य सेवा याची आकडेवारी लक्षणीय आहे. शिबिरात एकूण ७,२४६ नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. यासोबतच, डोळे तपासणी व चष्मा वाटपाचा लाभ २,०८३ नागरिकांना मिळाला, तर ४२३ महिलांची कर्करोग तपासणी करण्यात आली. याच वेळी, अनेक नागरिकांनी सामाजिक जाणीव ठेवत ३७८ जणांनी रक्तदान केले. तसेच, २६३ ज्येष्ठ नागरिकांची सहाय्यक उपकरणे वाटपासाठी नोंदणी करण्यात आली. या आकडेवारीवरून शिबिराची व्याप्ती स्पष्ट होते. या शिबिरामुळे आणि उपक्रमात सहभागी झालेल्या पुण्यातील नामवंत रुग्णालयांच्या सहकार्यामुळे अनेक गरीब आणि गरजू नागरिकांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळण्यास मदत झाली आहे. कुणालआबा वेडेपाटील आणि लक्ष्य फाउंडेशन यांनी आरोग्यसेवेच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा जो नवा आदर्श स्थापित केला आहे, तो निश्चितच प्रेरणादायक आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

समाजातील प्रत्येक घटकाला उत्तम आरोग्य लाभावे, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आरोग्यधन हे शिबिर आयोजित करण्यात आले होते आणि त्यामुळेच, केवळ उपचारांची व्यवस्था न करता, सर्वसामान्यांच्या आरोग्याची परिपूर्ण काळजी घेण्याचं काम या शिबिरातून करण्यात आलं आहे. या आरोग्य शिबिरासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे तसेच प्रभाग क्रमांक दहा मधील सहभागी नागरिकांचे मी मनापासून आभार मानतो अशी प्रतिक्रिया कुणाल वेडेपाटील यांनी दिली.