पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे, महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आज नाशिकमध्ये भाजपाची महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. जिथे शक्य तीथे महायुती म्हणून निवडणूक लढवणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.






नेमकं काय म्हणाले फडणवीस?
संघटनात्मक परिस्थिती युती कुठे होऊ शकते याचा आढावा घेत आहोत. जिथे शक्य तीथे महायुती करणार आहोत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुढे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या निमित्तानं विभागाच्या बैठका घेतल्या आहेत, त्या विभागामधल्या, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि महापालिका या संदर्भातील आढावा आम्ही घेत आहोत. तीथली संघटनात्मक परिस्थिती, तीथली बूथची रचना, तिथे मागच्या निवडणुकीत काय परिस्थिती होती, आता काय परिस्थिती आहे. युती कशी करायची, युती कुठे -कुठे करायची? असा सर्व प्रकारचा आढावा आम्ही या बैठकांच्या माध्यमातून घेत आहोत.
नाशिकमध्ये आम्ही उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेतला आहे. आम्ही या बैठकीत कार्यकर्त्यांचं म्हणणं एकूण घेतलं आहे, त्यांना पुढंच मार्गदर्शन केलं आहे. मागच्या निवडणुकीत आम्ही तिथे चांगलं यश मिळवलं होतं, याही वेळी चांगलं यश मिळेल अशी मला अपेक्षा आहे, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना फडणवीस यांनी म्हटलं की, जिथे शक्यत असेल तिथे महायुती करू, असंच वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील केलं होतं, कोणत्याही परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही, तिथे जर आपला चांगला कार्यकर्ता असेल तर मैत्रीपूर्ण लढत होईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर आरोप केला होता की, भाजप एकीकडे युतीबाबत बोलते, तर दुसरीकडे एकांतात स्वबळावर निवडणुका लढवण्याची भाषा करते, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता महायुतीमध्ये नेमकं काय सुरू आहे? आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी युती होणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.











