अमेरिकेचे स्व:हितार्थ ‘टेरिफ’, आत्मनिर्भर बना स्वावलंबी होण्याशिवाय पर्याय नाही; मोहन भागवत यांचं आवाहन

0

‘अमेरिकेने स्वत:च्या हितासाठी नवीन ‘टेरिफ’ धोरण स्वीकारले. त्याची झळ आपल्याला बसत आहे. या पार्श्वभूमीवर आपण स्वदेशीचा स्वीकार करत स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनायला हवे,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला गुरुवारी विजयादशमीच्या मुहूर्तावर शंभर वर्षे पूर्ण झाली. रेशीमबाग मैदानावर झालेल्या विजयादशमी सोहळ्यात डॉ. भागवत यांनी अमेरिकेने आकारलेले अतिरिक्त ‘टेरिफ’, पहलगाम हल्ला, शेजारील राष्ट्रांत सुरू असलेला संघर्ष, हिमालयातील नैसर्गिक परिस्थिती, तसेच जगाला भारताकडून असलेली अपेक्षा आदी मुद्द्यांना स्पर्श केला. ‘कुठलेही राष्ट्र अलिप्त राहून जगू शकत नाही. राष्ट्राराष्ट्रांमध्ये परस्परसंबंध असावे लागतात. मात्र, ही निर्भरता लाचार करणारी नको. यासाठी स्वदेशी आणि स्वावलंबी होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. स्वदेशी, स्वावलंबी आणि आत्मनिर्भरतेचा स्वीकार करत आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, व्यापारी संबंधांचे जतन करावे लागेल.’ असे भागवत यांनी नमूद केले.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

‘मैत्रिभाव जपताना सजगता हवीच’

‘पहलगाम येथे २६ भारतीय नागरिकांची त्यांचा धर्म विचारून हत्या करण्यात आली. त्याविरुद्ध आपले सरकार आणि सैन्याने तयारीनिशी प्रत्युत्तर दिले. त्यातून समाज आणि राष्ट्राची एकता व दृढता दिसून आली. तसेच आपण सर्व देशांशी मैत्रिभाव जपत असलो, तरी स्वत:च्या सुरक्षेसाठी सजग राहावे लागेल, याची शिकवण मिळाली. विविध देशांनी घेतलेल्या भिन्नभिन्न भूमिकेमुळे आपले खरे मित्र कोण याचीही जाणीव झाली’, अशा भावना सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी विजयादशमी उत्सवावेळी बोलताना व्यक्त केल्या.

सरसंघचालक भागवत यांनी शस्त्रपूजन केले. यंदा तलवार, ढाल या पारंपरिक शस्त्रांसह पिनाका मिसाइलच्या तीन विविध आवृत्ती, युद्धात वापरले जाणारे ड्रोन, रायफल गन यांचा समावेश होता. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राणा प्रताप कलिता, डेक्कन इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक के. व्ही. कार्तिक, बजाज फिनजर्व्हचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांसह घाना, दक्षिण आफ्रिका, थायलंड, इंडोनेशिया, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स येथील मान्यवरांचा समावेश होता. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, संघाचे विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे, नागपूर महानगर संघचालक राजेश लोया यांची उपस्थिती होती.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

संघात जातीभेदाला स्थान नाही : कोविंद

माझ्या आयुष्यावर डॉ. हेडगेवार आणि डॉ. आंबेडकर या दोन डॉक्टरांचा प्रभाव राहिला आहे, अशी भावना माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली. ‘संघात जातीभेद, अस्पृश्यतेला स्थान नाही. जागतिक पातळीवर कार्यरत अनेक संघटना १०० वर्षांत नष्ट पावल्या. पण, संघ अधिकाधिक विशाल आणि सशक्त होत आहे’, असे कोविंद म्हणाले. बाबासाहेब आंबेडकरांनी कराड येथे संघ स्वयंसेवकांची भेट घेत आवश्यकता पडल्यास संपूर्ण सहयोग करण्याचे आश्वासन दिले होते, अशी एक आठवण देखील त्यांनी सांगितली.