राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची पुन्हा एकदा जिभ घसरली. तुझ्या कुठल्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर टीका केली. तसेच जातीवंत पाटील असाल तर मला तारीख आणि वेळ सांगा, मी वाळव्यात येतो असं म्हणत त्यांनी थेट आव्हान दिलं. जतमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यात पडळकरांनी जयंत पाटलांवर टीका केली. महत्त्वाचं म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समज देऊनही पडळकरांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.






जयंत पाटलांवर या आधी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडळकरांचा निषेध करण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने या आधी सांगलीमध्ये संस्कृती बचाव कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. त्यावेळी जयंत पाटलांचे निकटवर्तीय असलेल्या दिलीप पाटील यांनी गोपीचंद पडळकरांवर टीका केली होती. त्या टीकेचा समाचार घेताना गोपीचंद पडळकरांनी दिलीप पाटील यांचा वाळव्याचा कुत्रा असा उल्लेख केला. मी सुभेदार मल्हाररावची औलाद आहे. तुम्ही जर माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न केला तर ती तुमच्यासाठी काळीकुट्ट अंधाराची रात्र असेल अशा शब्दात गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांना आव्हान दिलं.
जातीवंत पाटील असशील तर…
जयंत पाटलांवर टीका करताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, “मला गोप्या म्हटलं गेलं, मग मी तुला जयंत्या म्हटलं तर चालेल का? जयंत्याला आणि वाळव्याच्या कुत्र्याला आवाहन करतो, तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर तुम्ही उद्या दुपारी पत्रकार परिषद घ्या. गोपीचंद पडळकरने इश्वरपूरमध्ये यायचं की वाळव्यात यायचं, दिनांक, वार आणि वेळ सांगा मी तिथे येतो. माझ्याकडे पोरं पाठवायची गरज नाही आणि तुमच्याकडे ती हिंमत नाही. तुम्ही सांगाल तिथे मी येतो.”
जयंतराव, तुझ्या कुठल्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं?
माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातील आहे. तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता, जयंतरावांना माझा सवाल आहे, तुझ्या कुठल्या बायकोचं मी मंगळसूत्र चोरलं? विरोधक म्हणतात की माझे संस्कार खराब आहेत, पण ते काहीही म्हणू देत, मला काही फरक पडत नाही असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
अनेक कुत्र्यांना तुडवत इथंपर्यंत आलोय
गोपीचंद हा फकीर माणूस आहे, ना मला आगा ना पिछा. मला बदनाम करून मी संपणार नाही. अनेक गावठी कुत्र्यांना तुडवत तुडवत मी इथंपर्यंत आलोय असं गोपीचंद पडळकर म्हणाले. माझ्या विरोधातमध्ये अनेक वादळं, त्या वादळात उभे राहतो तो गोपीचंद पडळकर. जतमधील मायबापांनी मला निवडून दिलंय. पण माझ्यावर टीका करणारी ही औलाद हिंदू विरोधी आहे, त्याला जागा दाखवायची वेळ आली आहे अशा शब्दात पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली.
देवाभाऊंच्या मागे बाजीप्रभुंप्रमाणे उभा राहणार
गोपीचंद पडळकर म्हणाले की, “आरक्षणाच्या बाबतीत गंभीर विषय सुरू आहे. मराठा आणि ओबीसींना एकमेकांच्या विरोध उभा करण्याचं काम सुरू आहे. धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण द्यावं अशी आमची मागणी आहे. माझी जी काल भूमिका होती तीच आज आहे आणि उद्याही असेल. ज्यावेळी धनगरांच्या आरक्षणाचा विषय असेल त्यावेळी मी धनगरांच्या बाजूला असेन. जेव्हा देवाभाऊचा विषय असेल त्यावेळी मी देवाभाऊंच्या बाजूला बाजीप्रभुंप्रमाणे उभा असेन.”











