कर्वेनगर प्रभाग क्रमांक 30 मधील मैत्र जीवांचे ज्येष्ठ नागरिक संघ आणि ओंकार चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने एका आगळ्यावेगळ्या आणि सुरक्षात्मक विषयाचे अनुरूप स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मैत्र जीवांचे या समर्पक नावाप्रमाणे सध्याच्या ऑनलाईन व्यवहार जगामध्ये होणाऱ्या गुन्ह्यांबाबत व दक्षता याविषयी जेष्ठ नागरिकांना सविस्तर माहिती मिळावी या उदात्त हेतूने ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव स्वप्नील दुधाने अध्यक्ष कोथरूड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या वतीने ऑनलाईन सायबर क्राईम धोके आणि सावधानता या विचारमंथन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.






याप्रसंगी ग्लोबल सायबर क्राईम राष्ट्रीय पुरस्कार विजेते डॉ. धनंजय देशपांडे (डीडी) यांनी प्रमुख वक्ते म्हणून ऑनलाईन सायबर क्राईम धोके आणि सावधानता’ या विषयावर नागरिकांना मार्गदर्शन करताना प्राथमिक स्तरावर घेण्यात येणाऱ्या दक्षतांबाबत माहिती दिली.
पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या एक वर्षांमध्ये ऑनलाईनद्वारे २८० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील निव्वळ दोन कोटी रुपये अर्थात ०.७% रक्कम प्राप्त झाली असून फसवणुकीमध्ये बळी पडलेल्या नागरिकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. ज्येष्ठ नागरिकांना याबाबत मार्गदर्शन होणे काळाची गरज बनले असून याबद्दल त्यांनी आपले मत अत्यंत ओघवत्या शैलीत आणि मनमोकळ्या पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत दिशादर्शक प्रतिपादित केले.
डॉक्टर धनंजय देशमुख यांनी सांगितलेल्या काही सूचना:
- आपल्या ऑनलाईन ऍपवर ५००० रुपयांहून अधिक रक्कम ठेवू नये.
- निनावी फोन अथवा मेसेजला प्रतिसाद देऊ नये.
- कुठल्याही अनोळख्या व्यक्तीला ओटीपी शेअर करू नये तसेच ओटीपीच्या नावाखाली आता पीएनआर, पीएनआय अथवा पीन अशा अनेक नावाने मेसेज आल्यास तोही शेअर करू नये.
- सरकारी कार्यालय सोडल्यास कुठल्याही ठिकाणी खाजगी अथवा इतर ठिकाणी आधार कार्डऐवजी ड्रायव्हिंग लायसन्स अथवा इतर आयडेंटी कार्ड वापरावे. आधार कार्ड फक्त सरकारी कार्यालयातच द्यावे.
- आधार कार्डला आपल्या बँकेचे खाते, पासपोर्ट तसेच अन्य सर्व गोष्टी लिंक असल्याकारणाने सरकारी कार्यालयाव्यतिरिक्त आधार कार्ड कुठेही देऊ नये.
- सरकारी नियमानुसार मास्क आधार कार्ड प्रत्येकाने काढणे आवश्यक आहे. मास्क आधार कार्ड म्हणजे आपल्या आधारच्या १२ डिजिटपैकी ८ डिजिट झाकलेले असतात. अन्य चार डिजिट हे त्या आधार कार्डवर दर्शवले जातात. त्यामुळे आधार कार्डचा आपला नंबर कुठेही शेअर होत नाही. मास आधार कार्ड हे आपल्या जवळच्या ई सुविधा केंद्रामध्ये काढून मिळते. यामुळे जवळपास धोके ८०% थांबतील.
- गेल्या काही दिवसांमधील आलेल्या सर्वेनुसार शहरांमधील २२% ज्येष्ठ नागरिक फोन उचलण्याच्या काही गडबडीमध्ये त्यांचे अपघात होऊन त्यांना इजा होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे फोन उचलण्याची घाई करू नका.
- महिलांच्या बाबतीत सर्वाधिक ॲानलाईन फ्रॉड हे किचन टायमिंग अवर्समध्ये होतात.
- शुक्रवारी हा जास्त ॲानलाईन फ्रॉड होण्याचा दिवस असतो, त्यामुळे शुक्रवारी शक्यतो ऑनलाईन बँकिंग व्यवहार टाळावेत. शनिवार, रविवारी सुट्टी असल्यामुळे तुम्हाला बँकेकडून एसएमएस येत नाहीत, अथवा तुम्हाला तक्रार करायची असल्यास बँकेकडे सोमवार शिवाय पर्याय नाही.
- ऑनलाईन फ्रॉड झाल्यानंतर तुम्हाला लक्षात आल्यानंतर एका तासाचे आत त्याची तक्रार करणे आवश्यक आहे. कारण या एक तासात तुमचे पैसे गेलेले परत मिळवण्याचे ८०% चान्सेस राहतात. त्यानंतर हे पैसे रिकव्हरीचे चान्सेस फार कमी होतात.
- आता शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एमएनजीएल गॅस, एमएससीबी, पीएमसी पाण्याचे बिलांचे एसएमएस मेसेज येऊन ऑनलाईन पैसे मागण्याचे फ्रॉड हे वाढल्याचे प्रकार होत आहेत. अशा एसएममएसकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा.
- प्रत्येक नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये अँटीव्हायरस डाऊनलोड करणे आवश्यक आहे, जेणेकरून येणारे फ्रॉड कॉल रेड कलर मध्ये दिसू शकतात.
- आज कोणत्याही ॲपवर अँटिव्हायरस सॉफ्टवेअर फक्त दोनशे रुपयांमध्ये उपलब्ध असते.
- डिजिटल अरेस्ट हा प्रकार आता अनेक ऑनलाइन फ्रॉडमध्ये होताना दिसत असून कायद्यामध्ये डिजिटल अरेस्ट होऊ शकत नाही. त्यामुळे असल्या काही गोष्टीला न घाबरता ताबडतोब जवळच्या पोलिस यंत्रणेला कळवणे आवश्यक आहे.
- अनेक ज्येष्ठ नागरिक हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये शहरांमध्ये घडत आहे. त्यामुळे हनी ट्रॅपबाबतही सावधान असणे आवश्यक आहे. सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट अथवा रिक्वेस्ट आल्यास ती स्वीकारू नये अथवा तुम्हाला हा हनी ट्रॅप लक्षात आल्यावर ताबडतोब १९३० व १९४५ या दोन नंबरला आपण तक्रार देऊ शकता.
- आपण एटीएम कार्ड वापरत असाल तर ज्या बँकेचे एटीएम कार्ड असेल त्या बँकेमध्येच शक्यतो तुम्ही पैसे काढावे व पैसे काढल्यानंतर येणारी जी स्लिप आहे ती स्लिप तिथे टाकून न देता ती स्लिप आपण पुर्ण नष्ट करावी. शक्यतो स्लिप घेणे टाळावे आणि अथवा घेतले तर ती पूर्णपणे फाडून आपल्या घरातील अथवा इतर ठिकाणी कचऱ्याच्या डब्यात टाकावी. एटीएम ट्रांजेक्शन झाल्यानंतर क्लियर हे नावाचे बटन दाबा.
कार्यक्रमाचे आयोजन मैत्र जीवांचे ज्येष्ठ नागरिक संघाच्या संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेविका सौ लक्ष्मी दुधाने तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव स्वप्नील दुधाने व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. यावेळी कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक सदस्य डॉ. भालचंद्र कापडेकर सर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.











