राज्यात विधानसभेनंतर १५ लाख मतदार वाढ, आक्षेप नाही; पुण्यात ९०.३२ लाख व बीएमसीत १ कोटी मतदार

0

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मत चोरीचे गंभीर आरोप निवडणूक आयोगावर केले आहेत. यात त्यांनी महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघाचा उल्लेखही केलाय. या ठिकाणी हजारो मतदारांची नावं मतदार यादीतून कमी केली गेली असं गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले होते. आता राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर किती मतदारांची नावं नव्यानं समाविष्ट केली गेली आणि किती नावं कमी करण्यात आली याची आकडेवारी समोर आली आहे.

महाराष्ट्रात नोव्हेंबर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मतदार यादीत १४.७१ लाख मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. तर ४.०९ लाख इतक्या मतदारांची नावे कमी करण्यात आली असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. राज्यात सर्वाधिक ठाण्यात २.२५ लाख नवे मतदार आहेत. तर पुण्यात १.८२ लाख नव्या मतदारांची नावं मतदार यादीत समाविष्ट झाली आहेत. यामुळे ठाण्यातील मतदारांची संख्या ७४.५५ लाख तर पुण्यातील मतदारांची संख्या ९०.३२ इतकी झालीय. मुंबई उपनगरात ९५ हजार ६३० नवमतदार आहेत. तर तिथं एकूण मतदारांची संख्या ७७.८१ लाख इतकी झालीय. मुंबई शहरात १८ हजार ७४१ नवे मतदार वाढले आहेत. यामुळे मुंबई शहरातील मतदारांची संख्या २५.६२ लाख इतकी झालीय. राज्यात सध्या एकूण मतदारांची संख्या ९.८४ कोटी इतकी आहे. नोव्हेंबरपासून आतापर्यंत मुंबई महानगरात १.१४ लाख नव्या मतदारांची नोंदणी झालीय. यामुळे बीएमसी निवडणुकीत एकूण मतदारांची संख्या १.०३ कोटी इतकी झालीय.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

मतदार यादीत घोळाचे आरोप सध्या होत आहेत. पण विधानसभा निवडणुकीनंतर १४ लाखांपेक्षा जास्त नव्या मतदारांची नोंद झाली. पण अद्याप एकही लेखी तक्रार किंवा आक्षेप आमच्यापर्यंत आलेला नाही. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीला तयार केलेल्या मतदार यादीऐवजी आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नव्या मतदार यादीचा वापर केला जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

राज्यात १६.८३ लाख जणांनी मतदार म्हणून नोंदणीसाठी अर्ज केले होते. तर एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात नाव बदलण्यासाठी जवळपास १.९७ लाख अर्ज आले. पडताळणीनंतर १४.७१ लाख नव्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली. तर ४.०९ लाख मतदारांची नावं हटवण्यात आली आहेत.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा