कु. आर्या मनोज जाधव राष्ट्रीय पातळीवर “नॅशनल लेव्हल परफॉर्मर” म्हणून सुवर्णपदकाने सन्मानित

0

गुहागर दि. १८ (रामदास धो. गमरे) अस म्हणतात की “मेहनत, आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणा या गुणांच्या आधारे यशाचा शिखर गाठता येते” याचे उत्तम उदाहरण म्हणजे अंजनवेल, ता. गुहागर जिल्हा रत्नागिरी येथील बाल भारती पब्लिक स्कुल आर. जी. पी. पी. एल या शाळेत इयत्ता ८ वीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी कु. आर्या मनोज जाधव हि होय. नुकत्याच फरीदाबाद (हरियाणा) येथील ध्यान कक्षामध्ये “Value Your Virtues” या संस्थेच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील हिंदी वक्तृत्व स्पर्धेत आर्याने देशात चौथा तर राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. यासाठी तिला सुवर्णपदक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कु. आर्या मनोज जाधव ही बौद्धजन सहकारी संघ विभाग क्र. १, शाखा क्र. ७ मुक्काम गाव गुहागर या शाखेचे सल्लागार व बालभारती पब्लिक स्कुलचे आदर्श शिक्षक मनोज सोमा जाधव यांची सुकन्या असून तिला वडिलांनी लहानपणापासूनच थोर विचारवंत, अभ्यासक, संशोधक, महामानव यांच्या विचारांचे बाळकडू पाजले आहे ज्यामुळे आज आर्यांच्या शब्दांत धार आहे सोबतच बालभारती पब्लिक स्कुलच्या हिंदी विषयाच्या शिक्षिका सुमन लखन पाल यांच्या मार्गदर्शनाखाली कु. आर्या हिने स्पर्धेसाठी प्रशिक्षण घेतले असून सुमन लखन पाल यांनीही आर्यावर प्रचंड मेहनत घेऊन तिला घडविले त्यामुळेच कु. आर्याने देशात चौथा व राज्यात प्रथम क्रमांक पटकावला त्यामुळे आर्याच्या यशात शिक्षिका सुमन लखन पाल यांचा मोलाचा वाटा आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

सदर स्पर्धेला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. विभागीय स्तरावर तब्बल ५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्यातून राज्य पातळीवर ३ हजार विद्यार्थ्यांची निवड झाली पुढे राज्य पातळीवरून फक्त ६० विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी संधी देण्यात आली. या ६० निवडक स्पर्धकांमधून आर्याने प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावर देशात चौथा व राज्यात प्रथम क्रमांक पटकावून आपले वेगळेपण सिद्ध केले. आर्याने या स्पर्धेत “सत्यभाषी बनण्याचे महत्त्व” या विषयावर प्रभावी भाषण सादर केले. स्पष्ट उच्चार, मुद्देसूद मांडणी आणि विचारांची ताकद यामुळे परीक्षकांनी तिच्या वक्तृत्वाला विशेष दाद दिली. “सत्याचे पालन हेच व्यक्तिमत्त्वाची खरी ताकद आहे आणि प्रामाणिकपणा हीच खरी ओळख आहे” हा संदेश आर्याने आपल्या भाषणातून प्रभावीपणे प्रकट केला.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

आर्याच्या या यशामुळे शाळेचा तसेच गुहागर तालुका व रत्नागिरी जिल्ह्याचाही लौकिक वाढला आहे. सदर बातमी बौद्धजन मागासवर्गीय नागरी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कळल्याने बौद्धजन सहकारी संघाचे तालुका संघाचे चेअरमन व बौद्धजन मागासवर्गीय सहकारी पतसंस्थेचे संचालक दीपक मोहिते, चेअरमन के. सी. जाधव, तज्ञ संचालक संजय पवार, संचालक राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांनी कु. आर्याच्या अभिनंदनाचा ठराव पारित करून गाव व मुंबई शाखांच्या व पतसंस्थेच्या वतीने कु. आर्याचे कोडकौतुक करून तिला मंगलकामना दिल्या, सोबतच अंजनवेल ग्रामस्थ, नातेवाईक, आप्तस्वकीय, बाल भारती पब्लिक स्कुलचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्याद्वारे आर्या मनोज जाधव, मनोज सोमा जाधव व हिंदी विषयाच्या शिक्षिका सुमन लखन पाल यांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. आर्याच्या यशाबद्दल तिच्या पालकांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, “मेहनत आणि सातत्य यामुळेच हे यश शक्य झाले असून मुलीच्या चिकाटीचा आम्हाला अभिमान आहे.” स्थानिक पातळीवरही आर्याचे कौतुक होत असून पुढील काळात तिने राज्य व देशस्तरावर आणखी मोठे यश मिळवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार