कोथरूड वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी परिसरातील मुख्य कर्वे रस्ता पौड रस्ता डीपी रोड कर्वेनगर डी मार्ट चौक(आंबेडकर) या ठिकाणी इनस्पेक्शन, ॲक्शन आणि एक्झिक्यूशन या त्रिसूत्रीवर काम करा, असे निर्देश आढावा बैठकीत ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. कोथरुड वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी दर आठवड्याला बैठक घेणार असल्याचे ना. पाटील यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार आज ना. पाटील यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली.
यावेळी वाहतूक पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, महापालिका पथ विभागाचे अनिरुद्ध पावसकर, अतिक्रमण विभागाचे संदीप खलाटे, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर, प्रकाश बालवडकर, माजी नगरसेवक दीपक पोटे, कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, नवनाथ जाधव, अजय मारणे, डॉ. संदीप बुटाला, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आवश्यक्तेनुसार सीसीटीव्ही आणि एआय चलानची संख्या वाढवा, अशी सूचनाही त्यांनी आजच्या बैठकीत केली.
बैठकीच्या सुरुवातीला मागील बैठकीतील इतिवृत्तानुसार झालेल्या कारावाईचा आढवा ना. पाटील यांनी घेतला. त्यामध्ये ५० वॅार्डन नियुक्तीबाबत काय कारवाई केली? असा, सवाल ना. पाटील यांनी उपस्थित केला. त्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल, असे वाहतूक शाखेकडून आश्वस्थ करण्यात आले. यासोबत वाहतूक कोंडी होणाऱ्या भागात काय उपाययोजना केल्या याचीही विचारणा ना. पाटील यांनी केली. त्यावर वाहतूक कोंडी होणाऱ्या भागांची पाहाणी करून, आवश्यकतेनुसार वाहतूक पोलीसांची नियुक्ती केली असल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.
या बैठकीत सीसीटीव्हीचा मुद्दा ही चर्चेत आला. त्यावर ना. पाटील यांनी वाहतूक विभागाने कोथरुडमध्ये कुठे कुठे सीसीटीव्ही लावण्याची आवश्यकता आहे, याची पाहणी करावी, लोकसहभागातून सीसीटीव्ही कार्यान्वित करु असे आश्वस्थ केले. त्यासोबतच आवश्यकतेनुसार ‘एआय बेस चलन’ प्रणालीचाही अवलंब करावा, असेही सूचित केले. वाहतूक कोंडीमुक्त कोथरूडसाठी इनस्पेक्शन, ॲक्शन आणि एक्झिक्यूशन या त्रिसूत्रीवर काम करावे, त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करु, अशी ग्वाही त्यांनी यावेळी वाहतूक उपायुक्त हिम्मत जाधव यांना दिली. दरम्यान, बाणेर-बालेवाडी भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी याच आठवड्यात बैठक घेणार असून, विभागाने मागील बैठकीच्या इतिवृत्तावर कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले.