खराडी परिसरातील एक 28 वर्षीय तरुण ‘सेक्सटॉर्शन’ला बळी पडल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणाशी ऑनलाइन मैत्री करून त्याची नग्न छायाचित्रे व मॉर्फ व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करून या तरुणाकडून अडीच लाख रुपये उकळण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील खराडी भागातील थिटेनगर परिसरात राहणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणाने या संदर्भात तक्रार दिली आहे. त्यावरून सायबर चोरट्या तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मोबाइलवर अनोळखी क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला. ‘सोनम गुप्ता’ नावाच्या तरुणीने व्हॉट्स अॅपद्वारे तरुणाशी आधी संभाषण व हळूहळू व्हिडिओ कॉलिंग सुरू केले.
व्हिडिओ कॉलवर अश्लील चाळे
तिने व्हिडिओ कॉलवरून अश्लील चाळे करून ‘स्क्रीनशॉट’ घेतले. त्यानंतर ते फोटो व व्हिडिओ मॉर्फ करून समाजमाध्यमात व्हायरल करण्याची धमकी दिली. भीतीपोटी तक्रारदार तरुणाने आरोपीच्या सांगण्यानुसार वेळोवेळी पैसे पाठवले.
सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा
सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या व्हिडिओ कॉलला उत्तर देऊ नका. फोन किंवा समाजमाध्यमातून धमकी मिळाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधा, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
डिजिटल अरेस्टची धमकी देत उकळले २४ लाख
डिजिटल हाउस अरेस्टची धमकी देत सायबर ठकबाजांनी मिनरल एक्स्प्लोरेशन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे निवृत्त अधिकारी विजय पाठक यांना 24 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी मनोज शर्मा नावाच्या ठकबाजाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दोन जुलै रोजी ठकबाजाने पाठक यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. ‘मी दिल्लीतील दूरसंचार विभागाचा अधिकारी आहे. तुमच्या आधार कार्डावर कॅनरा बँकेत खाते उघडण्यात येऊन पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. त्याबदल्यात तुम्हाला सहा कोटी रुपये मिळाले. मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यात या घोटाळ्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. तुम्हाला अटक करण्यात येणार आहे, अशी भीती त्यांना दाखवण्यात आली. त्यानंतर वेळोवेळी सायबर गुन्हेगाराने त्यांच्याकडून एकूण 23 लाख 71 हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाठकांनी सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली.