चक्क MBBS डॉक्टरच निघाला ड्रग तस्कर; पुण्यात १५ लाखांचा एमडी जप्त, तिघांना अटक

0

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील एका नामांकित रुग्णालयात काही महिन्यांपूर्वीपर्यंत नोकरी करणारा एमबीबीएस डॉक्टर अमली पदार्थ तस्कर (ड्रग) निघाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने संबंधित डॉक्टरसह तिघांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे १५ लाख रुपयांचा मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ जप्त केला. ही कारवाई बिबवेवाडीतील निमंत्रण हॉटेलसमोर करण्यात आली.

महंमंद ऊर्फ आयान जारून शेख (वय २७, रा. उंड्री) असे डॉक्टरचे नाव आहे. त्याच्यासह सॅम्युअल बाळासाहेब प्रताप (वय २८, रा. हिंगणे खुर्द), अनिकेत विठ्ठल कुडले (वय २७, रा. नारायण पेठ) या दोघांना अटक केली आहे. या तिघांविरोधात बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, दयानंद तेलंगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महंमद शेख हा मूळचा जम्मूचा असून, त्याने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील एका नामांकित रुग्णालयात तो वैद्यकीय प्रॅक्टिस करत होता. यापूर्वी त्याला ड्रग प्रकरणात अटक झाली होती. त्यानंतर डॉक्टर पदावरून निलंबित करण्यात आले. तरीही त्याने तस्करी थांबवली नाही. आता दुसऱ्यांदा ड्रग्ज तस्करीप्रकरणी पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. महंमद शेख याच्यासह कुडले यालाही बंडगार्डन भागात ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली होती. हे लोक ओळखीतील लोकांना एमडी पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे. या तिघांनी ‘एमडी’ कोठून आणले, याचा शोध घेतला जात आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

कारमधून केली ड्रग विक्री

पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली होती, की बिबवेवाडी येथील निमंत्रण हॉटेलसमोरील रस्त्यावर तीन जण एका कारमध्ये संशयास्पदपणे थांबले असून, ते ड्रग्ज विक्री करत आहेत. त्या आधारे पोलिसांनी कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले. या वेळी शेखकडून पाच लाख रुपयांचे एमडी जप्त करण्यात आले, तर सॅम्युअल प्रतापकडून सहा लाख ३८ हजार रुपये किमतीचा आणि कुडले याच्याकडून सव्वा तीन लाख रुपये किमतीचे ‘एमडी’ जप्त केला. यासह गुन्ह्यात वापरलेली कार, मोबाइलही पोलिसांनी ताब्यात घेतले.