एका खाजगी शाळेतील शिक्षिकेने दिलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या अध्यक्षाने तिचा पाठलाग करत तिच्याशी अश्लील वर्तन, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत शिक्षिकेने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर शाळेच्या अध्यक्षानेही शिक्षिका आणि तिच्या समर्थकांविरोधात प्रतितक्रार दाखल करत मारहाण व शाळेच्या मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप केला आहे.






या प्रकरणात २८ वर्षीय महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार, चैतन्य गुलाब लांडगे (३६, रा. लोणी काळभोर) याच्यावर विनयभंग, मारहाण व धमकी यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लांडगे हे मांजरी बुद्रुक येथील मोरे वस्तीजवळ असलेल्या कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल या संस्थेचे अध्यक्ष आहेत. तक्रारदार शिक्षिका यापूर्वी या शाळेत कार्यरत होती, मात्र काही दिवसांपूर्वी तिने नोकरीचा राजीनामा दिला होता.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लांडगे यांनी राजीनाम्याचा राग मनात धरून १२ जुलै रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास शिक्षिकेचा पाठलाग केला. तिच्या घराजवळ येऊन त्यांनी अश्लील भाषा वापरत, तिला जबरदस्तीने ओढून अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे. यावेळी तिच्या गालावर आणि डोळ्याजवळ मारहाण करत जखमी केल्याचंही तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर काही जणांना बोलावून “तुला सोडणार नाही, जीवे मारतो,” अशी धमकीही दिल्याचं तिने म्हटलं आहे.
या तक्रारीवरून हडपसर पोलिसांनी लांडगेविरोधात भारतीय दंड विधानातील संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश कावळे करत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
दरम्यान, चैतन्य लांडगे यांनीही प्रतितक्रार दाखल केली असून, शिक्षिका व तिच्या सात साथीदारांनी शाळेच्या परिसरात येऊन शिवीगाळ, धमकी आणि दगडफेक करत शाळेच्या खिडकीच्या काच फोडल्याचा आरोप केला आहे. तसेच संबंधित शिक्षिका पालकांना चुकीची माहिती देऊन विद्यार्थ्यांचे नाव शाळेतून काढण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
या वादामुळे शाळा प्रशासन आणि शिक्षकांमध्ये सुरू असलेली कुरबूर आता उघड झाली असून, दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी अधिक तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.











