भिमाशंकरला दर्शनासाठी जात असताना एका ६९ वर्षीय दिल्लीस्थित वयोवृद्ध भाविकाला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे रेल्वे स्थानकाजवळून ऑटो रिक्षा भाड्याने घेतल्यानंतर, चालकाने वाटेत रस्त्यापासून दूर जंगलात नेऊन हा प्रकार केला. या प्रकरणी अज्ञात ऑटोचालकाविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्लीतील रहिवासी सुरेशचंद्र चौहान (वय ६९) यांनी यासंबंधी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी पुणे रेल्वे स्थानकाच्या पार्सल गेटजवळून त्यांनी एक ऑटो रिक्षा भाड्याने घेतली. चालकाने भाडे निश्चित करून त्यांना भिमाशंकर दर्शनासाठी घेऊन जाण्याचे कबूल केले.
मात्र प्रवासाच्या अर्ध्यावर आल्यानंतर, चालकाने मार्ग बदलून भिमाशंकरजवळील जंगलात रिक्षा नेली आणि चौहान यांना चाकूचा धाक दाखवून धमकावले. त्यांच्याकडून जबरदस्तीने Google Pay द्वारे ४,५०० रुपये ट्रान्सफर करवून घेतले आणि खिशातील रोख १५,००० रुपये काढून घेतले. एकूण १९,५०० रुपयांचा अपहार करून आरोपीने चौहान यांना जंगलातच सोडून दिले आणि पसार झाला.
या प्रसंगानंतर चौहान यांनी वाटेतून जाणाऱ्या वाहनांची मदत घेत पुन्हा पुण्यात परत येत बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात ऑटोचालकावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४) (दरोडा) आणि ३५१(३) (गंभीर धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, विशेषतः पार्सल गेट परिसरातील व्हिडीओ रेकॉर्डिंगवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे तपासाचे नेतृत्व करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौहान हे कामानिमित्त शनिवारी पुण्यात आले होते आणि त्यानंतर भिमाशंकर या प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते.
यापूर्वी डिसेंबर २०२४ मध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती, ज्यामध्ये १९ वर्षीय तरुणाला ऑटोचालकाने मारहाण करत ३०० रुपये आणि ९०,००० रुपयांचा मोबाइल चोरला होता.