मुंबई दि. ८ (अधिराज्य) सर्वसाधारण पाहता सिनेमा शुटींग म्हणजे सलग २०-२५ दिवसांचे शूटिंग करीत १-२ शेड्युलमध्ये सिनेमा शूट करणे, परंतु आजवर कधी ऐकलं आहे का की एखाद्या दिग्दर्शकाने आठवड्यातील पाच दिवस नोकरीधंदा सांभाळून प्रत्येक आठवड्यातील शनिवार रविवार शूटिंग करून सिनेमा पूर्ण केला ?.. “नाही ना, तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे होऊच शकत नाही” परंतु ही अशक्य वाटणारी गोष्ट आनंद देवदेशमुख या तडफदार हरहुन्नरी लेखक-दिग्दर्शकाने स्वतःच्या हिमतीवर पूर्ण करून दाखवली आहे. “आनंदाचे डोही आनंद तरंग” अस म्हणतात की आनंदाच्या डोहात आनंद तरंग उमटत असले तरी त्या गूढ डोहाच्या तळाशी असलेल्या अव्यक्त व अनाकलनीय वेदना या केवळ त्या डोहालाच माहीत असतात. अशाच एका आनंदाच्या डोहाची व त्यातील आनंद तरंगाची ही कथा.
आनंद देवदेशमुख पुण्यातील सुसंस्कृत परिवारातील IT फिल्डमध्ये नोकरीस असलेला एक श्लाघ्य तरुण, IT क्षेत्रात नोकरी व शिक्षण हे घर-परिवार यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याच्या हेतूने असले तरी मन मात्र सिनेमामेकिंग यात रमलेल असायचं, पण सिनेसृष्टीत उतरण तितक सोपं नाही त्यातच जर तुम्हाला फॅमिली बॅकग्राऊंड किंवा कोणी गॉडफादर नसला तर मात्र या क्षेत्रात टिकाव लागणे मुश्किल.. आनंद देवदेशमुख या तरुणास कोणताही फॅमिली बॅकग्राउंड किंवा गॉडफादर नसताना ही त्याने सिनेक्षेत्रात झेप घेतली व स्वतःच्या कर्तृत्वावर मक्तेदारी मोडत स्वतःचा असा नवीन ठसा उमटवला.
परिस्थिती बेताची असल्याने सिनेसृष्टीचे प्राथमिक धडे शिकण्यासाठी कोणतीही महागडी इन्स्टिट्यूट न लावता किंवा कोणालाही असिस्ट न करता आनंदने स्वतःचा मार्ग निवडला स्वतः स्वतःला प्रशिक्षित करण्याचा; त्यासाठी त्याने शॉर्टफिल्मस पासून आपल्या कारकिर्दीची सुरवात केली; प्रसंगी अडकला, धडपडला पण शेवटी स्वतःच्या पायावर स्वतःच्या हिमतीने कोणाच्याही मेहरबानीच्या कुबड्या न घेता स्वतः उभा राहिला. अश्या या तरुणाने जेमतेम चार शॉर्टफिल्म्सच्या लेखन व दिग्दर्शनानंतर थेट झेप घेतली ती फुल लेन्थ सिनेमा मेकिंगमध्ये व त्यातूनच “प्रारब्ध” या सिनेमाच्या कथेने आनंद देवदेशमुखांच्या सिद्धहस्त लेखणीतून जन्म घेतला.
प्रारब्ध म्हणजेच नशीब… मग आनंदने सिनेमातील पात्रांच नशीब लिहिलं की सिनेमाने लेखक-दिग्दर्शक आनंदच? खरच हा यक्षप्रश्न म्हणावा लागेल, कारण या सिनेमाच्या पडद्याआड एक वेगळाच नशीबाचा खेळ सुरू होता. सिनेमाची संहिता तयार झाली, आनंदने अत्यंत मेहनतीने स्वतः ५०% रक्कम जमा करून बाकी ५०% करता काही सहनिर्माते जोडले, प्री प्रोडक्शन, पेपरवर्क झाल शूट ही लागलं आणि देशात लॉकडाऊन लागलं आणि सर्वच बारगळल, सर्व मेहनतीवर पाणी.. त्यात मोठं आर्थिक नुकसान व समोरा कोरोनारुपी दानव, लॉकडाऊन मध्ये जणू पाठीचा कणाच मोडला परंतु तरीही न खचता अगदी फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून झेप घेत पुन्हा एकदा आनंद देवदेशमुख उभा ठाकला व आपलं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचे त्याने ठरवलं परंतु पुन्हा एकदा बजेट उभं करणे कठीण असल्याने आनंद देवदेशमुख पुन्हा एकदा IT क्षेत्रात नोकरीवर रुजू झाले वर्षभर नोकरी करून स्वतःच्या व कुटुंबाच्या पोटाला पिळ मारून पगारातील पै अन पै जमा केला केवळ चित्रपट निर्मितीच्या ध्यासाने; कमीतकमी खर्चातच उत्कृष्ट सिनेमा बनवण्याचं आधीच निश्चित केल्याने सिनेमा निर्मितीला लागतील इतकी रक्कम जमा झाली होती परंतु सलग २०-२५ दिवस शेड्युल त्यानंतर तितकेच दिवस पोष्ट प्रोडक्शन करता, नोकरीवर इतकी मोठी सुट्टी भेटणे अशक्यच व नोकरी सोडवी तर घरचा उदरनिर्वाह कसा चालणार यातूनच एक कल्पना पुढे आली की सोमवार ते शुक्रवार नोकरी करून शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी शुटींग करावं तस पाहता हा टास्क सोप्पा नव्हता परंतु सलग तीन महिने फक्त शनिवार रविवार शूटिंग करत अत्यंत हिंमतीने, शर्थीने व जिद्दीने आनंद देवदेशमुख यांनी “प्रारब्ध” हा सिनेमा पूर्ण केला; जगातील सर्वात सुंदर व भावनिक नाते म्हणजे वडील व मुलगी यांचे नाते, प्रत्येक मुलीचा पहिला हिरो आणि पहिला मित्र म्हणजे तिचे वडील, प्रारब्ध सिनेमा भीमा व त्याची मुलगी मीरा यांच्या हृदयस्पर्शी नात्यावर आधारित आहे, जीवनातील आंतरिक संघर्षावर मात करण्यासाठी झगडणाऱ्या परंतु झगडत झगडत त्या व्यथेत गुरफटत जाणाऱ्या हृदयद्रावक स्थितीतील बाप-लेकीची कथा.. एक दिग्दर्शक म्हणून पहिल्याच प्रयत्नात इतका गंभीर विषय हाताळणे कठीण असलं तरी आनंद देवदेशमुख यांनी अत्यंत बारकाईने अभ्यास करून हा विषय हाताळला आहे व त्याची जाणीव प्रारब्ध सिनेमा पाहताना प्रेक्षकांना होते; जगभरातील नामवंत फिल्म फेस्टिव्हल मध्ये जवळपास ३२ पुरस्कार, दादासाहेब फाळके फिल्म पुरस्कार, भारत गौरव पुरस्कार, कान्समध्ये स्क्रिनिंग असे अनेक मानाचे तुरे आपल्या शिरपेचात रोवत प्रारब्ध सिनेमा यशाची शिखरे पादाक्रांत करीत आहे, सध्या हा सिनेमा “प्रारब्ध” या नावाने YouTube वर उपलब्ध आहे, प्रारब्ध व प्रारब्ध सिनेमाचे प्रारब्ध लिहिणाऱ्या आनंद देवदेशमुख यांच्या अद्वितीय कामाची झलक पाहण्यासाठी आवर्जून पहावा असा हा सिनेमा सर्वांनी बघावा असा आहे.