भारताच्या केएल राहुलने लीड्स टेस्टमध्ये शानदार शतक ठोकून टीम इंडियाला मजबूत स्थितीत पोहोचवले. चौथ्या दिवशीच्या खेळानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राहुलने केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चा सुरू झाली आहे की, तो अप्रत्यक्षपणे टीम इंडियावर टीका करत होता का?
राहुलने पत्रकार परिषदेत सांगितले की, गेल्या काही वर्षांत तो आपली बॅटिंग पोझिशन विसरला होता. कधी त्याला ओपनिंगसाठी, कधी नंबर 3, कधी 5 किंवा अन्य क्रमांकावर खेळायला पाठवले गेले. त्यामुळे त्याच्या भूमिकेमध्ये सातत्य नव्हते. त्याच्या या वक्तव्यातून भारतीय संघ व्यवस्थापनाच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित झाल्याचे दिसले.
तथापि, राहुलने हेही स्पष्ट केले की, त्याला जी जबाबदारी देण्यात आली, ती त्याने स्वीकारली आणि त्या प्रत्येक भूमिकेचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला. त्याला स्वतःला नव्याने सिद्ध करण्याची संधी मिळाली आणि तो त्या क्षणांचा आनंद घेत होता.
केएल राहुलने लीड्स टेस्टच्या दुसऱ्या डावात 247 चेंडूंवर 137 धावा करत टीम इंडियाचा डाव भक्कम केला. त्याच्या या खेळीमुळे भारताने इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले. राहुल म्हणाला, “माझ्यासाठी फार काही बदललेलं नाही. फरक इतकाच आहे की आता मी धावा करत आहे. पूर्वी सुरुवात चांगली असली तरी मोठ्या स्कोरमध्ये रूपांतर करता येत नव्हतं.”
राहुलच्या या वक्तव्यातून त्याच्या मनातील खंत आणि आत्मविश्वास दोन्ही झळकले. टीममधील भूमिकेतील अनिश्चिततेवर भाष्य करतानाच, आपल्या जबाबदारीवरही तो ठाम होता.