भारत-इंग्लंड कसोटी मालिकेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. नव्या वर्षात नव्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर सज्ज झाला आहे. कसोटी संघाचा नवीन उपकर्णधार ऋषभ पंतने लीड्समधील पत्रकार परिषदेत संघाची तयारी, स्वतःची भूमिका आणि अहमदाबाद विमान अपघाताबाबत मनोगत व्यक्त केले.
पंत म्हणाला, “मी उपकर्णधार झालो आहे म्हणजे काही माझं मनोवृत्ती बदलणार नाही. आम्ही जसे होतो, तसेच राहू.” तो पुढे म्हणालो की सध्या तो चांगल्या मानसिक स्थितीत आहे. नवीन जबाबदारी असली, तरी मैदानात उतरल्यावर लक्ष फक्त खेळावर असेल.
विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर. अश्विन यांसारख्या ज्येष्ठ खेळाडूंनी निवृत्ती घेतल्यानंतर ऋषभ पंत हा आता संघातील मुख्य वरिष्ठ खेळाडूंपैकी एक झाला आहे. मात्र, याचा गर्व त्याला नाही. त्याने स्पष्ट सांगितले, “मी संघातील तरुण खेळाडूंशी पूर्वीप्रमाणेच वागणार आहे. त्यांना मार्गदर्शन करणे, प्रेरणा देणे हे काम मी नेहमीच करत राहीन.”
पत्रकार परिषदेत पंतने अहमदाबाद विमान अपघाताबाबतही भावना व्यक्त केली. तो म्हणाला, “संपूर्ण देश सध्या दु:खात आहे. अशा कठीण काळात आम्ही जर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकून देशवासीयांना थोडीसे आनंदाचे क्षणं देऊ शकलो, तर त्याहून मोठा सन्मान आमच्यासाठी नाही.”
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली नवी टीम इंडिया एक नवीन पर्व सुरू करत आहे. इंग्लंडमध्ये भारताने कसोटी मालिका जिंकली त्याला १८ वर्षं उलटून गेली आहेत. यंदा जर विजय मिळाला, तर ती केवळ क्रीडाविजय न राहता देशासाठी भावनिक विजय ठरेल.