‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाची सर्व देशवासियांना माहिती व्हावी, यासाठी असीम फाऊंडेशन आणि युवा सुराज्य प्रतिष्ठानच्या संयोजनातून ‘ऑपरेशन सिंदूर- नव्या भारताचा सामर्थ्यविष्कार’ हा कार्यक्रम कोथरूडमध्ये आयोजित केला आहे. या कार्यक्रमात ले. जनरल राजेंद्र निंभोरकर (नि.) आणि ले. जनरल विनायक पाटणकर (नि.) यांची प्रकट मुलाखत होणार आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्विततेची माहिती सर्वांना व्हावी यासाठी असीम फाऊंडेशन आणि युवा सुराज्य प्रतिष्ठानच्या संयोजनातून ‘ऑपरेशन सिंदूर- नव्या भारताचा सामर्थ्यविष्कार’ हा प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमात ले. जनरल राजेंद्र निंभोरकर (नि.) आणि ले. जनरल विनायक पाटणकर यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर संवाद साधणार आहेत. दिनांक ३० मे २०२५ रोजी सायं. ६.०० ते ८.३० वेळेत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे हा कार्यक्रम होणार आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने दिनांक ६ आणि ७ मे २०२५ रोजी मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून आपल्या अचाट सामर्थ्याचे दर्शन संपूर्ण जगाला घडवत, दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्धवस्त केले. अन् दहशतवादाला मातीत मिळविण्याची भारताची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे देशभरातील नागरिकांमध्ये प्रचंड आनंद व्यक्त करण्यात आला. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला ‘जशास तसे’ उत्तर मिळाले. तसेच, यामुळे भारतीय सैन्य दलाच्या अचाट आणि अचंबित करणाऱ्या सामर्थ्याचे दर्शन जगाला झाले.
या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ हे देखील प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तरी सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.