बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणी सीआयडीने मोठे पाऊल उचलले आहे. देशमुख खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्व सातही आरोपींना मोका लावण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या घोषणेची अंमलबजावणी केली आहे.
संतोष देशमुख खूनप्रकरणी सीआयडीकडून करण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे. या प्रकरणी आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणीतील आणखी एक आरोपी अद्यापही फरार आहे. सर्व आरोपी अटक करण्यापूर्वीच सीआयडीने या सातही आरोपींना मोका लावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात विधानसभेत याबाबतची घोषणा केली होती.
संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणी आतापर्यंत सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, विष्णू चाटे, प्रतीक घुले व सिद्धार्थ सोनवणे या सात जणांना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरारी आहे. त्याचा शोध बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची तिन्ही पथक घेत आहेत..
दुसरीकडे अटकेत असलेले आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. त्यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. या दरम्यान, आज विष्णू चाटे याला न्यायालयात हजर करण्यात आले असून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्याची पोलिस कोठडी मागितली जाण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना सभागृहात संतोष देशमुख खून प्रकरणातील सर्व आरोपींवर ‘मोका’नुसार कारवाई केली जाईल, अशी घोषणा केली होती. सीआयडीने त्यानुसार पावले उचलत मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची आज अंमलबजावणी केली. संतोष देशमुख खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्व सातही आरोपींवर मोका नुसार कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.