नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांनी केलेल्या कर्जाचा डोंगर व्याजासह 252 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला होता. 25 जुलै रोजी मुंबईच्या राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणानं दिलेल्या निर्णयाविरोधात देसाई यांनी दिल्लीतील एनसीएलटीमध्ये अपील देखील केले होते. मात्र, त्यांचे अपील फेटाळण्यात आलं. सर्व प्रकरण नेमकं काय आहे ते पाहू.
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आर्थिक अडचणी वाढल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जातंय. याप्रकरणी नितीन देसाई यांच्या एनडीज आर्ट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेडविरोधात दिवाळखोरी संहितेंतर्गत दाखल केलेल्या दाव्यावर कार्यवाहीचा अंतिम आदेश एनसीएलटी मुंबई खंडपीठाने 25 जुलै रोजी झालेल्या सुनावणीत दिला होता. याप्रकरणी कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी 1 ऑगस्ट रोजी दिल्लीतील एनसीएलटीकडे अपील केले होते. मात्र हे अपील देखील फेटाळण्यात आले होते. त्यामुळेच 2 ऑगस्टच्या रात्री नितीन देसाई यांनी हे टोकाचे पाऊल उचलले का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
किती होतं नितीन देसाईंवर कर्ज?
2016 साली एनडीज आर्ट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेडनं ईसीएल फायनान्स लिमिटेडकडे 150 कोटी रुपयांचे कर्ज मागितले होते. साली पुन्हा एकदा ईसीएल फायनान्सकडे 35 कोटी रुपयांचे कर्ज मागितले गेले, मात्र कंपनीला 31 कोटीच रुपयेच वितरीत केले. एनडीज कंपनीवर एकूण कर्ज 181 कोटी रुपये देण्यात आले होते. 2020 सालचा कोरोना, टाळेबंदीमुळे नितीन चंद्रकांत देसाई त्यावेळी कर्ज चुकवू शकले नाहीत. अशात कला दिग्दर्शक नितीन देसाईंचे कर्ज ईसीएल कंपनीनं एनपीए नियमांखाली त्यांच्या खात्याचे वर्गीकरण केले.
आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार हे खाते SMA-2 मध्ये वर्ग करण्यात आले. यावरुन देसाई यांची कंपनी मूळ हप्ते आणि व्याजाची रक्कम नियमितपणे देत नव्हती असं दिसत होतं. ज्यात कर्ज 31 मार्च 2021 पर्यंत एनपीए म्हणून घोषित करण्यात आले होते. 30 जून 2022 पर्यंत एकूण डिफॉल्ट रक्कम 250.48 कोटी रुपये गेली होती. 31 मार्च 2022 आणि 9 मे 2022 या दोन मुदत परतफेडीच्या अंतिम तारखा दिल्या होत्या. त्या पाळल्या न गेल्याने कर्ज बुडीत खात्यात म्हणजेच एनपीए म्हणून घोषित करण्यात आले होते.
एनसीएलटीकडे केस सुरु असतानाच मूळ अर्जदार सीएफएम ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीनं दावा दाखल केला होता. सुनावणी सुरु असतानाच त्यांनी सर्व दायित्व आणि दाव्यासंबंधीच्या गोष्टी एडेल्वाइज ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडे वर्ग केला. याप्रकरणी नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कंपनीनं न्यायधिकरणाकडे दाद देखील मागितली. मात्र त्यांचे अपील फेटाळण्यात आले. त्यामुळे 1 ऑगस्ट रोजी दाखल केलेले त्यांचे अपील आणि त्यांच्याविरोधात आलेला निर्णय… आणि 2 ऑगस्ट रोजी कला दिग्दर्शक यांनी उचललेलं टोकाचं पाऊल याचा संबंध जोडला जातोय.