पुणे शहरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मॉन्सूनपूर्व पावसाचा जोर गुरुवारी (ता. २२) काहीसा ओसरला असला, तरी पुढील दोन दिवस शहराला ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (ता.२३) आणि शनिवारी (ता. २४) पुणे शहर आणि जिल्ह्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गेल्या चार दिवसांपासून पुण्याला मॉन्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले आहे. मंगळवारी शिवाजीनगर परिसरात ४०.५ मिमी पावसाची नोंद झाली, तर बुधवारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) परिसरात १०३ मिमी पाऊस झाला. पावसामुळे अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. झाडे उन्मळून पडली, फलक कोसळले आणि दुचाकींचे मोठे नुकसान झाले.
पाणी साचल्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, गुरुवारी पावसाने थोडी उसंत घेतल्याने शहराला काहीसा दिलासा मिळाला. कमाल तापमानातही किंचित घट होऊन ते ३१ अंश सेल्सिअसवर आले, तर किमान तापमान २२.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुढील दोन दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले.
पुणे आणि परिसरात शुक्रवार (ता. २३) आणि शनिवारी (ता. २४) कमाल तापमान अनुक्रमे ३१ आणि ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे. आकाश अंशतः ढगाळ राहील आणि मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
रविवारी (ता. २५) आकाश अंशतः ढगाळ राहून मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.